५० किलोपेक्षा अधिक वजनाची गोणी न उचलण्यावर माथाडी कामगार ठाम; उद्या शेवटचा दिवस
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोणी न उचलण्याच्या भूमिकेवर माथाडी कामगारांनी नुकतेच तीव्र आंदोलन केले होते. या प्रश्नावर बाजार समितीमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करून तोडगा काढण्यात आला होता. यावेळी १५ डिसेंबर हि अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. तर या तारखेनंतर कोणत्याही परिस्थिती ५० किलो पेक्षा अधिक वजनाची गोणी उचलली जाणार नसल्याचे माथाडी कामगारांनी ठाम केले होते. त्यामुळे ५० किलो पेक्षा अधिक वजनाची गोणी उचलण्याचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे.
या  प्रश्नावर पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या दालनात बैठक पार पडली होती. या प्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, माथाडी नेते नरेंद्र पाटील, मार्केट संचालक अशोक वाळुंज, व्यापारी प्रतिनिधी राजू मणियार आदी पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. त्याच धर्तीवर आज माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा बैठक घेण्यात आली. या बैठकीत शेतमालाचे नुकसान झाले तरी चालेले परंतू तो माल उचलला जाणार नाही असा इशारा माथाडी कामगारांनी पुन्हा एकदा दिला आहे. शिवाय याबाबत कांदा-बटाटा मार्केटमध्ये दोन दिवस आधीपासून जनजागृती सुरु केली आहे. त्यामुळे १६ तारखेपासून ५० किलो पेक्षा अधिक  वजनाचा  शेतमाल बाजार आवारात आल्यास  तो    पडून राहणार हे निश्चित आहे.
याबाबत शेतकरी आणि ३०५ बाजार समित्यांमध्ये जनजागृतीसाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. विशेष करून ज्या भागातून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणी येतात त्या ठिकाणी जाऊन याबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात आला होता. तर राज्याबाहेरील माल ५० किलो गोणीत यावा याकरिता केंद्रीय कृषिमंत्री आणि पणन विभागाचा सहभाग घेऊन तोही प्रश्न निकाली काढण्याची भूमिका बैठकीत घेण्यात आली होती.
कांदा, बटाट्याच्या गोणीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असू नये असा नियम शासनाने केला आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली होती. या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू होते. त्यामुळे जादा वजनाच्या गोणी ट्रकमधून खाली करण्यात आल्या नव्हत्या. परिणामी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा-बटाटा गाडीत पडून राहिला होता.
या पूर्वी वेळोवेळी बैठका घेऊन ७० ते ७५ टक्के माल ५० किलोत आणण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. परंतू पुणे, संगमनेर व सोलापूर येथून येणारा माल सुद्धा ५० किलोमध्ये आला पाहिजे याकिरता बैठक महत्वपूर्ण ठरली होती.