निसर्ग कोपला शेतातील पिके पुन्हा उद्वस्थ होण्याच्या मार्गावर
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी उध्वस्थ होण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून सध्याच्या रब्बी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान झाले तर आता रब्बी हंगामातही पिकांचे नुकसान सुरु झाले आहे. पेरणीपासून रब्बी हंगामातील पिकांवर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. सुरवातील अवकाळी पाऊस त्यानंतर ढगाळ वातावरण आणि आता थंडीतील चढउतार देखील रब्बी हंगामातील पिकांना बाधित होत आहे. त्यामुळे फळ धारणेपूर्वी पिकाचे नुकसान झाले तरी औषध फवारणीमधून सावरता येत होते. पण आता फळधारणा झालेल्या पिकावरच परिणाम होत असल्याने हे न भरुन निघणारे नुकसान आहे. रब्बी हंगामातील पिकांना थंडी ही पोषक असते मात्र, गेल्या महिन्याभरापासून वातावरणातील बदल पिकांना घातक ठरत आहे.
दर १५ दिवसांनी वातावरणातील बदलाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ज्या जोमात पिकांची वाढ होते त्यास अडथळा निर्माण होत असून याचा थेट उत्पादनावर परिणाम होत आहे. या बदलत्या वातावरणामुळे हरभरा, गहू, ज्वारी या पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे वाढ खुंटली असून आता फळधारणा होण्याप्रसंगीच निसर्गाचा लहरीपणा पुन्हा धोकादायक ठरत आहे. एकीकडे उत्पादनात घट होत असताना वाढत असलेला खर्च ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे झाले तर आता ढगाळ वातावरणाचा धोका रब्बी हंगामातील पिकांवर कायम आहे.
यंदा रब्बी हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर हरभरा या पिकाचा पेरा झालेला आहे. उत्पादनाची सर्व मदार आता याच पिकावर आहे. दोन महिन्यापूर्वी पेरणी झालेला हरभरा आता फुलोऱ्यात आला आहे. असे असताना शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन वेळा औषध फावरणी करावी लागलेली आहे. उत्पादन पदरी पडेपर्यंतच अधिकचा खर्च होतो पण वातावरणातील बदलामुळे उत्पादन मिळेलच असे नाही. यापूर्वी खरिपात जे झाले तीच स्थिती रब्बी हंगामाची होऊ नये अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.