मुंबई APMC व्हेंटिलेटरवर; तिजोरीत खडखडाट!
सेस मिळवून देण्यात कांदा-बटाटा मार्केट आघाडीवर तर फळ आणि भाजीपाला मार्केटचा सेस जातो कुठे?
मुंबई APMC बाजार समिती शेवटच्या घटका मोजत असल्याचे चित्र समोर आले आहे. बाजार समितीचे उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत चालल्याने दोन वर्षांपासून बाजार आवारात कोणतेच विकासकामे झाली नाहीत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी बाजार समितीकडे पैसा नसल्याचे सांगण्यात येत आहे. बाजार समिती टिकावी यासाठी बैठका घेऊन आमदार शशिकांत शिंदे, सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर आणि बाजार संचालक उत्पन्न वाढीवर निवडून आल्यापासून चर्चा करत आहेत. मात्र, काही संचालक आणि भ्रष्ट अधिकारी बाजार समितीच्या उत्पन्न घटण्याला कारणीभूत असल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे. काही कर्मचारी उत्पन्न वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. उत्पन्न वाढीच्यादृष्टीने पाऊले पडण्यास सुरुवात झाली कि त्यांची बदली करण्यात येते. मग कशाप्रकारे बाजार समितीचे उत्पन्न वाढणार हा सवाल बाजार घटक करू लागले आहेत.
भाजीपाला आणि फळ मार्केटच्या सेस वाढीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जाणकार मांडत आहेत. भाजीपाला मार्केटमध्ये प्रतिदिन जवळपास ६०० गाडी आवक होते. या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विविध भाजीपाला विक्रीसाठी येतो. या ठिकाणी ९३६ गाळे आणि १५०० परवानाधारक व्यापारी असताना या बाजारातून जमा होत असलेला सेस चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे. शिवाय उत्पनाच्या तुलनेत या मार्केटमधील सुविधांवर अधिक खर्च होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजीपाला मार्केटचे उत्पन्न नक्की कोठे जाते असा सवाल बाजार घटकांना पडला आहे. तर हीच अवस्था आणखी काही दिवस राहिल्यास कामगारांपासून बाजार समिती कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्याचबरोबर शेजारच्या फळ मार्केटमध्ये प्रतिदिन जवळपास ३०० गाडी आवक होते. या मार्केटमध्ये भाजीपाला मार्केटच्या तुलनेत गाडी आवक कमी असली तरी मोठ्या प्रमाणात विविध फळे बाजारात विक्री होतात. फळ मार्केटमध्ये १००० गाळे १५०० परवानाधारक व्यापारी आहेत. तर फळांचे दर पाहता फळ मार्केटचा सुद्धा सेस कमी असल्याचे दिसत आहे. या मार्केटमध्ये सुद्धा सेस व्यापाऱ्याच्या तुलनेत कमी होऊन या ठिकाणी सेस घालण्यासाठी सेसचा झोल सुरु असल्याची चर्चा बाजार घटकांमध्ये सुरु आहे.
या उलट केवळ २२५ गाळे ३३४ परवानाधारक व्यापारी एवढा लहान कारोबार असताना कांदा बटाटा मार्केट चांगला सेस बाजार समितीला देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ कांदा, बटाटा आणि लसूण असे तीन प्रकार विकून संप, आंदोलन अशा विविध समस्यांना सामोरे जाऊन सुद्धा कांदा-बटाटा मार्केट चांगला सेस देत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या मार्केटच्या तुलनेने अधिक गाळे, व्यापारी आणि आवक असून सुद्धा भाजीपाला आणि फळ बाजाराचा सेस बाजार समितीला कमी येत असल्याने शेवटच्या घटका मोजत असलेली बाजार समिती लवकरच नामशेष होणार असे दिसत आहे.
तर मसाला, धान्य आणि कांदा-बटाटा मार्केटमध्ये कचरा आणि रस्ते यावर होणार खर्च भाजीपाला आणि फळ मार्केटच्या तुलनेत खूपच कमी आहे. असे असून सुद्धा या मार्केटकडून अधिक सेस आणि खर्च आलेल्या मार्केटकडून कमी सेस बाजार समितीला मिळत आहे. त्यामुळे फळ आणि भाजीपाला मार्केटची अवस्था आमदनी अठ्ठानी, खर्चा रुपया" अशी झाली आहे. अशा परिस्थितीत धान्य, मसाला आणि कांदा-बटाटा व्यापारी आमच्या मार्केटचा विकास कसा होणार असा सवाल करत आहेत.
बाजार समितीच्या माहिती अहवालानुसार नोव्हेंबर महिन्यात मिळालेला सेस खालीलप्रमाणे
मार्केट सेस रक्कम (लाखात)
भाजीपाला ५७.९४
फळ ५४.५१
कांदा-बटाटा ७२.३३
मसाला  १४६.२०
धान्य    १७१.०७
मार्केट ३  ५०.७२
ऊस ०.०२
ठाणे मार्केट १०.२९
नारळ १३.४८
दक्षता विभाग ०८.२८