थंडीच्या दिवसात दुखणे वाढल्यास घ्या अशी काळजी
थंडीमुळे काही दुखणी वाढतात जसे कि वातरोग वाढीस लागतो. गुडघ्याचे दुखणं वाढते. त्यासाठी आहारातून कडू, तिखट पदार्थ कमी केले पाहिजे. आहार, विहार आणि व्यायाम या त्रिसुत्रीचा वापर केला पाहिजे. गुळापासून तयार झालेले पदार्थ जास्त घेतले पाहिजे. तूप सेवन केले पाहिजे. सकाळी रोजीसारखे गोड पदार्थ सेवन केले पाहिजे. जेवणात लसणाचा वापर जास्त करावा. लसणाची फोडणी द्यावी. तिळाच्या तेलाची मालीश करावी. उष्ण पदार्थ जास्त सेवन करावे. शक्यतो उपवास टाळावा. हळद, अद्रकाचा वापर आहारात वाढवावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दूध, दही, मलाई, रबडीचा आहारात समावेश करावा. कोमट पाणी प्यावे. थंडीत जठराग्नी बलवान झाल्याने आहार कमी पडता कामा नये. मधूर, आम्ल, लवण रस प्राशन करावे. जेवण गरम करावे.
हिवाळा हा ऋतू सर्व ऋतूंमध्ये आरोग्यदायी मानला जातो. आरोग्याची काळजी घेणारे सकाळी वॉकला जातात. त्यामध्ये मध्यमवयीन तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त असते. सकाळी थंडी वाढल्यास व्यायामापासून आपण दुरावतो. थंड हवा आरोग्याला पोषक असते. मात्र, धुक्याचे प्रमाण जास्त असते. धुक्यातील प्रदूषण हे दिसत नाही. धुक्यातून वाट काढताना सावधगिरी बाळगली पाहिजे. दमा तसेच श्वसनासंबंधी आजार या काळात जास्त बळावतात. त्यामुळं विशेष काळजी घेण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. थंडीत त्वचा सांभाळणे एक आव्हानच असते. जागरूक लोकं सकाळी-सकाळी फिरतात. काही जण तर रस्त्यावर धावतात. पहाटेची कोवळे ऊन-वारा अंगावर घेण्यासाठी ही सारी धावपळ असते. तर सकाळी सर्वानी थोडातरी व्यायाम करावा असे सांगण्यात येत आहे.
सकाळीची हवा शंभर रोगांची दवा असे म्हटले जाते. मात्र, या कालावधीतील प्रदूषणयुक्त धुके धोकादायक आहे. थंडीत दमा, ब्रॉन्कॉयटीस असे श्वसनासंबंधी आजार वाढतात. योग्य काळजी घेतली नाही, तर दमाग्रस्तांना हृदयविकाराचा, फुप्फुसाचा अटॅक येऊ शकतो. योग्य प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने फुप्फुसांवर आघात होतो. सर्दी, ताप, खोकला, कफ यांचाही त्रास वाढतो, असे डॉक्टर सांगतात. सध्या सर्दी, खोकला, ताप तसेच श्वसन विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. थंड वातावरणामुळे रोग प्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे फिटनेससाठी हा काळ उत्तम आहे. मात्र, थंडीत श्वासनलिका आकुंचन पावत असल्याने श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.