राज्य सरकारच्या निर्बंधानंतरही हळद अधिकच पिवळी, सांगली बाजारपेठेत सर्वोच्च दर
नवी मुंबई : राज्यात हळदीचे क्षेत्र आणि उत्पादकता या दोन्ही बाबी दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याचबरोबर आता दरातही विक्रमी वाढ होत असल्याने (Farmer Satisfaction) शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, वाढत्या उत्पादकतेला महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणाचा एका निर्णयाचा अडसर झाला होता. त्यामुळेच राज्यात हळदीच्या दरात मोठी घसरण झाली होती. हळद ही शेतीमालच नसल्याचा निर्णय प्राधिकरणाने दिल्याने त्याचा थेट दरावर परिणाम झाला होता. असे असताना देखील आठवड्याभरातच हळदीला अधिकच पिवळा रंग चढल्याचे चित्र सांगली बाजारपेठत पाहवयास मिळाले आहे. हळदीच्या दरात क्विंटलमागे तब्बल 3 हजार 850 रुपयांची सुधारणा झाली आहे. हा हंगामातील सर्वोच्च दर मानला जात आहे.
दर स्थिर पण कमीच
हळद हा शेतीमाल नसल्याचे महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणाने जाहीर करताच त्याचा परिणाम थेट दरावरच झाला होता. शिवाय हळदीच्या व्यापारावर 5 टक्के जीएसटी लागू करण्यात आला होता. त्यामुळे दरात क्विंचलमागे 1 हजार 800 रुपयांची घसरण होऊन हळदीचे दर हे 15 हजार रुपये क्विंटलवर स्थिर झाले होते. मात्र, हे स्थिर झालेले दर हळदीची उत्पादकता आणि मागणी यानुसार कमीच होते. अखेर बुधवारी सांगली बाजारपेठेत हळदीच्या दरात तब्बल 3 हजार 850 रुपयांची वाढ झाली असल्याचे दै लोकसत्ता ने प्रकाशित केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये आता वाढ होणार असल्याचे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले आहे.
नवीन हळदीचा हंगाम 2 आठवड्यांनी होणार सुरु
सध्या बाजारपेठेत गत हंगामातीलच हळदीची आवक सुरु आहे. सांगली जिल्हा तसेच मराठवाड्यातील हिंगोली, जालना, परभणी या जिल्ह्यांमध्ये हळदीचे उत्पादन घेतले जाते. आता 2 आठवड्यांनी नवीन हळदीची आवक सुरु होणार आहे. त्यामुळे अचानक दरात वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी हळदीला किमान 6 हजार तर कमाल 18 हजार रुपये क्विंटल असाच दर होता. तर आठवड्यापूर्वी किमान दर 5 हजार तर कमाल दर 11 हजार 300 रुपये होता. वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनाही चांगला फायदा झाला आहे.
राज्यात सर्वाधिक लागवड हिंगोली जिल्ह्यात
हळदीची बाजारपेठ आणि लागवड क्षेत्र या दोन्ही बाबींमध्ये हिंगोली जिल्हा आघाडीवर आहे. येथील बाजारपेठेतून गुजरात, कर्नाटक या ठिकाणी हळदीची निर्यात केली जाते. तर राज्यातील 84 हजार लागवडी क्षेत्रापैकी एकट्या हिंगोली जिल्ह्यात 49 हजार हेक्टरावर हळदीची लागवड केली जात आहे. योग्य व्यवस्थापन येथील शेतजमिन यामुळे उत्पादकताही मोठ्या प्रमाणात आहे. येथील बाजारपेठेतील चोख व्यवहरामुळे परराज्यातील हळद उत्पादक शेतकरी वसमत येथील बाजारपेठ जवळ करीत आहेत.