अवकाळी पावसाचा शेतीला दणका; शेतकरी हवालदिल
यंदा शेतकऱ्याच्या अडचणी काही संपत नसून यात त्याचे मोठे नुकसान झाले आहे. आता सुरु असलेल्या फळबागांवर अवकाळी पावसाची अवकृपा सुरु झाली असून राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. 2 डिसेंबरला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आज पासूनच नाशिक, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळा सुरुवात झाली आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा शेती व्यवसायावर होत आहे. कोणत्याच पिकासाठी हा पाऊस आणि वातावरण पोषक राहणार नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
यंदा सर्वच हंगामातील पिकांवर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम पाहवयास मिळालेला आहे. दर पंधरा दिवसांनी वातावरणात होणारा बदल शेती व्यवसायासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. कारण शेतकऱ्यांचे परिश्रम तर निष्फळ ठरत आहेतच पण अधिकचा पैसा खर्ची करुन उत्पादन पदरी पडत नसल्याची शोकांतिका आहे. आता फळबागासह, रब्बी हंगामातील पिके आणि कांद्यावरही किडीचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राज्यात काही ठिकाणी हंगामी पिक म्हणून कांदा लागवडीवर भर दिला जातो. शिवाय बाजारपेठही जवळच असल्याने कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, वातावरणात होत असलेल्या बदलाचा सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. कारण खरिपातील कांद्याचे नुकसान हे पावसामुळे झाले होते तर आता अवकाळीमुळे रब्बी हंगामातील कांद्यावर मावा , करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. बुधवारी राज्यातील कांदा उत्पादन भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव व नियोजनासाठी शेतकऱ्यांना अधिकचा पैसा खर्ची करावा लागणार आहे.
प्रत्येक हंगामातील पिके ही अंतिम टप्प्यात असतानाच पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळेच खरीप पाठोपाठ रब्बी हंगामही धोक्यात आहे. आता कुठे पिकांची उगवण झाली असताना ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. पिक उगवताच किडीचा प्रादुर्भाव होत असल्याने त्याचा वाढीवर आणि भविष्यात उत्पादनावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे शतकऱ्यांना महागडी औषधे घेऊन फवारणी करावी लागत आहेत. तर दुसरीकडे कोकणात आंबा, काजूला मोहर लागला असून त्याची गळती सुरु झाल्याने दोन दिवसांतून एकदा किडनाशक आणि बुरशीनाशकाची फवारणी शेतकऱ्यांना करावी लागत आहे.
त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांबरोबर आंबा, द्राक्ष या फळबागांवर देखील किटकनाशक आणि रोगनाशक हे एकत्रित मिसळून फवारणी केली तरच उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.