अवकाळी पावसाने फळबागा अडचणीत, असा होईल परिणाम
राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फळबागांमध्ये द्राक्षे, आंबा, काजू आणि डाळिंब या पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे.
द्राक्ष- द्राक्ष बागांमध्ये प्रीब्लूम फुलोरा व मनी सेटिंग नंतर अशी अवस्था आहे. पावसामुळे आद्रतेचे प्रमाण वाढले असून अशा परिस्थितीत दाट कॅनॉपी असल्यास फळकुज, मनिगड,डाऊनी मिल्ड्यू व भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
डाळिंब-हस्त बहारातील बागेत सध्या फुलधारणा झाली आहे. जोराचा पाऊस झाल्यास फुलगळ होऊ शकते.अर्लीबहारातील बागेत सेटिंग झाले आहे. अशा परिस्थितीत ढगाळ वातावरण कायम राहिल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
आंबा आणि काजू- अशा वातावरणामुळे आंबा आणि काजू पिकावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. पावसानंतर ढगाळ वातावरण राहील याचा आंब्यांच्या पालवी आणि मोहोरावर तपकिरी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
मोसंबी- सध्याच्या काळात पाऊस पडला त्यामुळे आंबिया बहराच्या तानावर व्यतेययेईल. ढगाळ वातावरण असेच राहिले तर फुलोरे ऐवजी नवती फुटण्याची शक्यता आहे.
केसर आंबा- ढगाळ वातावरण आणि कमी थंडीमुळे मोहर फुटण्यावर परिणाम होऊ शकतो. ज्या ठिकाणी मोहर फुटला आहे त्याचे पावसामुळे गळ होऊ शकते. तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
संत्रा- संत्रा बागेमध्ये सध्या 60 टक्के मृगबहार फुटला आहे. सध्याच्या काळात पाऊस झाला तर बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आंबिया बहराची फळे ठेवली आहेत तिथे बुरशीजन्य रोगाने फळगळ होऊ शकते.
केळी- सध्या ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिले तर करपा रोग वाढू शकतो. जोराचा पाऊस झाल्यानंतर बागेत पाणी साचून राहिले तर रोपांची वाढ मात्र मंदावते.