कापूस तेजीत आणखी दरवाढीचा अंदाज
कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरी या पिकाचा बाजारपेठेत तोरा कायम आहे. सरकीच्या दरातील चढ-उताराचा परिणाम कापसावरही होत असला तरी ज्या शेतकऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली आहे त्याचे सोनेच होणार असल्याचे संकेत कृषितज्ञ देत आहेत. या आठवड्यात सरकीच्या दरात वाढ होताच कापूसही वधारला आहे. गेल्या काही दिवसांपासून कापसाचे दर हे १० हजारवर स्थिरावले असले तरी भविष्यात कापसाला १३ हजार रुपये क्विंटलचा दर मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. फेब्रुवारीच्या शेवटी कापूस उत्पादन किती झाले याचा अंदाज येतो यावरुनच दर काय राहणार हे सांगता येते. पण घटत्या उत्पादनामुळे एप्रिलमध्ये कापसाला विक्रमी दर मिळेल असा अंदाज पणन महासंघाचे माजी व्यवस्थापक गोविंद वैराळे यांनी व्यक्त केला आहे.
हंगामाच्या सुरवातीला कापसाच्या उत्पादनात घट होणार हे स्पष्ट असतानाही बाजारपेठेतील दर हे कमीच होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीपेक्षा साठवणूकीवरच अधिकचा भर दिलाच. जो निर्णय सोयाबीनबाबत तोच कापसाच्या पिकाबाबतही घेण्यात आला होता. वाढीव दर मिळाला तरच विक्री अन्यथा साठवणूक. त्यामुळेच आज हंगामाच्या अंतिम टप्प्यात आणि भविष्यातही कापसाचे दर हे कायम राहणार आहेत. सध्या १० हजारावर कापूस स्थिरावला असला तरी एप्रिलमध्ये दरात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
सरसकट सर्वच कापसाला सारखाच दर असे बाजारपेठेतले चित्र नाही. कापसाच्या दर्जानुसार दर ठरले जातात.धाग्याची लांबी २९ मि.मी पेक्षा अधिक असणाऱ्या तसेच कापसाचा शुभ्रपणा ७४ टक्केपेक्षा अधिक असल्यास चांगला दर मिळतो. कापसामध्ये आर्द्रतेचे प्रमाण हे ९ टक्केपेक्षा कमी असावे लागते तर कचऱ्याचे प्रमाण हे ३ टक्केपेक्षा कमी असल्यास अशा कापसाला चांगला दर मिळतो. त्यामुळे केवळ साठवणूकच महत्वाची नाही तर त्याची काळजी घेणेही गरजेचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून कापूस १० हजारावर तर सोयाबीन हे ६ हजार ५०० वर स्थिरावलेले आहे. या दोन्ही पिकांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले आहे. सध्या कापसाचा हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी या महिन्याच्या अखेरीसच कापसाच्या उत्पादनाबद्दल अधिकृत सांगता येणार आहे. मात्र, उत्पादन घटले हे निश्चित असून ज्या शेतकऱ्यांनी योग्य पध्दतीने कापसाची साठवणूक केली त्यांना वाढीव दर मिळणारच असा कृषितज्ञांचा अंदाज आहे.