“या भाज्या खा, निरोगी राहा”
प्रथिने (Protein) शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. शरीराच्या बहुतेक पेशींमध्ये प्रथिने असतात. त्वचा, रक्त, हाडे आणि स्नायू पेशींच्या विकासासाठी प्रथिने आवश्यक आहेत. प्रथिनांचा आहारात समावेश करण्याचा एक आरोग्यदायी पर्याय म्हणजे प्रथिने युक्त भाज्यांचे सेवन करणे. प्रथिन्यांसाठी तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्यांचा (vegetable) आहारात समावेश करू शकता. त्यात हिरव्या पालेभाज्यांचाही समावेश आहे. प्रथिने समृद्ध असलेल्या कोणत्या भाज्यांचा आहारात (Diet) समावेश करू शकता ते जाणून घेऊया.
ब्रोकोली
ब्रोकोली ही भाजी लोकांना विशेष खायला आवडत नाही, तसेच याबद्दल फार कमी लोकांना माहीती आहे. पण ब्रोकोली खाल्ल्याने प्रथिने चांगल्या प्रमाणात मिळतात. तुम्ही याचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. तुम्ही ब्रोकोलीचे सेवन सॅलडच्या स्वरूपातही करू शकता. आठ दिवसातून किमान एक वेळा तरी आपल्या आहारामध्ये ब्रोकोलीचा समावेश करायला हवा.
मशरूम
प्रथिने मिळवण्यासाठी तुम्ही मशरूमचे सेवन देखील करू शकता. मशरूमचा थंड प्रभाव असतो. यामुळे शरीरातील उष्णता दूर होते. मशरूममध्ये प्रथिनांचे प्रमाण चांगले असते. मशरूम कर्करोगाशी निगडीत गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. अभ्यासामध्ये असे निष्पन्न झाले आहे की, प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो.
पालक
पालकामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यात प्रथिने असते. हिरव्या पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वोत्तम भाजी आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आपण पालकाच्या सूपचे देखील आपल्या आहारामध्ये समावेश करू शकता. पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते.
बटाटा
बटाटे हा प्रथिनांचाही चांगला स्रोत आहे. बटाट्याची करी आणि उकडलेले बटाटे खाल्ल्याने शरीराला प्रथिने सहज उपलब्ध होतात. जवळपास सर्वच भाज्यांमध्ये बटाट्याचा वापर केला जातो. बटाटे खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. मात्र, बटाट्याचे प्रमाणामध्येच सेवन करा. अन्य़था वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
मटार
हिरव्या वाटाण्यामध्ये प्रथिने चांगल्या प्रमाणात आढळतात. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. अल्झायमर, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांना दूर ठेवण्यासाठी हे उपयुक्त आहेत.
सोयाबीन
सोयाबीन हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. सोयाबीन सहज प्रथिनांची कमतरता पूर्ण करते. याशिवाय सोयाबीनचे दूध, सोया सॉस आणि सोयाबीन पेस्टमध्येही भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. यामुळे सोयाबीनचा देखील आहारात समावेश करणे फायदेशीर आहे.
कोबी
कोबी बहुतेकदा सॅलड म्हणून खाल्ली जाते. हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. 100 ग्रॅम ताज्या गोबीमध्ये सुमारे 1 ते 2 ग्रॅम प्रथिने आढळतात. प्रथिन्यांची कमतरता पूर्ण करण्यासोबतच हे पचन आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही चांगले असते.