शेतकरी लुटीचे बहाणे; शेतकऱ्यांनी केली बाजार समितीच बंद
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडत्याच्या नावाखाली कमी वजन आकारले जाते. पण विनाकारण प्रतिक्विंटलमागे ३०० ग्रम शेतीधान्याची कपात हे अकोट बाजार समितीचे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. खरेदीदाराकडून शेतीमालाचे वजन करताना ३०० ग्रॅमची कपात ही ठरलेलीच आहे. नेमके यामागचे कारण काय? हे देखील शेतकऱ्यांना सांगितले जात नाही. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असून शेतकऱ्यांनी याला थेट विरोध केला आहे. शिवाय प्रशासकही शेतकऱ्यांच्याच बाजूने उभे राहिले असून खरेदीदार आणि शेतकरी यांच्यात मतभेद वाढले असल्याने चक्क बाजार समितीमधील व्यवहार हे बंद ठेवावे लागले आहेत. जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासकाने घेतला आहे. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे झालेले नुकसान आणि आता बाजारपेठेमध्ये लूट यामुळे शेतकरी त्रस्त आहे.
प्रत्येक क्विटलमागे ३०० ग्रॅम शेतीमालाची कपात हा विषय चांगलाच रंगलेला आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष वाढत असून जिल्हा उपनिबंधक यांनाही यामध्ये हस्तक्षेप करावा लागला होता. जर पोत्याचे वजन धरुन हे केले जात असेल तर ठिक आहे पण निव्वळ शेतीमालाच्या बाबतीत असे होत असेल तर ते चूकीचे असून जिल्हा उपनिबंधक विनायक कहाळेकर यांनी जिल्ह्यातील सर्वंच बाजार समित्यांना याबाबत पत्रव्यवहार केला आहे. असे असतानाही शेतकऱ्यांची लूट सुरुच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने आता प्रशासक उभे राहिले आहे. अकोट तालुका परिसरातून मोठ्या प्रमाणात शेती मालाची आवक होत असताना अशा प्रकारे मापात-पाप होत असेल तर ही एक फसवणूकच आहे.
शेती मालाच्या वजनात अनियमितता यावी म्हणून बाजार समित्यांनी खरेदीदार यांना अत्याधुनिक पध्दतीचे वजन काटे देण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार अकोट बाजार समितीनेही वजन काटे पुरवले आहेत. असे असताना व्यापारी हे क्विंटलमागे ३०० ग्रॅम धान्य घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय यामागे उद्देश काय हे देखील स्पष्ट केले जात नाही.
शेतकरी आणि खरेदीदार यांच्यातील मतभेद दिवसानुसार वाढत आहेत. त्यामुळे बाजार समितीच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवले जात आहे. शिवाय शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची आणि व्यापाऱ्यांची भांडणे यामुळे येथीव व्यवहारावर परिणाम होत आहे. त्यामुळे या कपातीबाबत योग्य ते धोरण ठरत नाही तोपर्यंत व्यवहार हे बंद राहणार आहेत.