कांदा दरात घसरण; शेतकरी चिंताग्रस्त
गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याने शेतकऱ्यांना तारलेले आहे. आवक वाढूनही दर स्थिर होते. यंदा खरीप हंगामातील कांदा उशिराने बाजारपेठेत दाखल झाला होता. असे असतानाही त्याचा दरावर परिणाम नव्हता तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजारपेठेत यंदा विक्रमी आवक होऊनही दर हे स्थिरच होते. मात्र, आता उन्हाळी हंगामातील कांद्याची एंन्ट्री बाजारपेठेत झाली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत अधिकची वाढ झाल्याने शनिवारच्या तुलनेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 550 रुपयांनी दर घसरले. त्यामुळे कांद्याला लहरीपणाचे पीक कशामुळे म्हणतात याचा प्रत्यय आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आला. यावेळे कांद्याने ग्राहकांच्या नाहीतर शेतकऱ्यांच्या डोळ्याला पाणी आणले आहे. देशांतर्गतच्या मुख्य बाजारपेठात लाल कांद्याची आवक वाढली आहे.तर नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सोलापूर या भागातही नवीन उन्हाळ कांद्याची लाल कांद्याच्या बरोबरीने आवक येत असल्याने याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजार भाव वर झाला आहे.
शनिवारी 1 हजार 233 वाहनातून 17 हजार 826 क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाली कमाल 2625 रुपये, किमान 651 रुपये तर सर्वसाधारण 2100 रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाला होता तर आज सोमवारी 1 हजार वाहनातून पंधरा हजार क्विंटल कांद्याची आवक लासलगाव बाजार समितीत दाखल झाली कमाल 2077 रुपये, किमान 900 रुपये तर सर्वसाधारण 1750 रुपये प्रतिक्विंटल ला बाजार भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.शनिवारच्या तुलनेत आज सोमवारी कांद्याच्या कमाल बाजारभावात साडे पाचशे रुपयांनी घसरण झाली आहे.
आतापर्यंत खरीप हंगामातील लाल कांद्याचीच आवक होती. शिवाय सरासरीप्रमाणेच आवक असल्याने गेल्या दीड महिन्यापासून कांद्याचे दर हे टिकून होते. लासलगावच नाही तर सोलापूर, अहमदनगर येथील बाजारपेठेत आवक वाढूनही दर कायम होते. यंदा उन्हाळी कांद्याचे क्षेत्र हे वाढलेले आहे. शिवाय सध्याच दर हे टिकून असल्याने छाटणी झाली की लागलीच विक्रीवर भर दिला जात आहे. त्यामुळे लाल कांद्याची सरासरीएवढी आवक होत असताना त्यामध्ये आता उन्हाळी कांद्याची भर पडल्याने अचानक 550 रुपयांनी दर घसरले आहेत.
आतापर्यंत द्राक्ष निर्यातीला तर युध्दाचा कुठे अडसर झालेला नाही. पण कांदा निर्यातीसाठी अडचण निर्माण होऊ शकते असा अंदाज सचिव नरेंद्र वाढवणे यांनी व्यक्त केला आहे. कंटनेरच्या माध्यमातून कांद्याची निर्यात होते. मात्र, आता युध्दजन्य परस्थिती निर्माण झाल्याने वाहनांना सहाजासहजी परवानगी दिली जात नाही. शिवाय कांद्याची वेळेत वाहतूक झाली नाही तर त्याची नासाडी होते. आतापर्यंत ही समस्या उद्भवली नव्हती पण आता आपल्याच रीस्कवर कांद्याची निर्यात करावी लागणार आहे. त्यामुळे घटते दर आणि आता निर्यातीवरटे निर्बंध यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागणार आहे.