शेतकरी चौहूबाजूने कोंडीत; मेथी जुडी २ रुपये
शेती हा मुख्य व्यवसाय, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हे ऐकायला बरं वाटत असलं तरी प्रत्यक्ष बांधावरची आणि बाजारपेठेतील स्थिती काय आहे याची अनुभती सध्या नागपूरच्या कॉटन मार्केटमध्ये पाहवयास मिळत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मुख्य पिकांच्या उत्पादनात घट तर झालीच आहे पण यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी पालेभाज्याची लागवड केली. पीक शेतकऱ्यांच्या हातामध्ये नव्हते तेव्हा दर गगणाला भिडले होते. पण आता पालकाची जुडी ही २ ते ३ रुपयांना विकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. लागवड, जोपासणा, वाहतूकीचा खर्च आणि पालकाला मिळत असलेला दर यामुळे बळीराजा एकच प्रश्न विचारत आहे तो म्हणजे सांगा शेती करायची कशी? भाज्यांचे थोडे दर वाढले, की महागाईच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांसाठी ही बातमी. दोन – तीन रुपयांना पालकाची जुडी विकण्याची नामुष्की असल्याने लेकराबाळांचं पोट कसं भरायचं? हा सवाल शेतकरी करीत आहेत.
यंदा खरीप हंगामातील पिकांचे पावसामुळे नुकसान झाले होते. उत्पादनात मोठी घट झाल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होतो. पाण्याची उपलब्धता आणि कमी पैशांमध्ये अधिकचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचा पर्याय निवडला. शिवाय पिकांची वाढ होताना बाजारपेठेत मेथी आणि पालकाचे दर गगणाला भिडले होते. मात्र, शेतकऱ्यांचा भाजीपाला बाजारपेठेत दाखल होताच दर कोसळले आहेत. नागपूरातील कॉटन मार्केटमध्ये २ ते ३ रुपायांना पालकाची जुडी विकली जात आहे. वाढीव उत्पन्न तर सोडाच पण वाहतूकीचा खर्च निघाला तरी मिळवले अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ खरीप हंगामातील पिकांचेच नुकसान झाले असे नाही तर ढगाळी वातावरण आणि धुक्यामुळे भाजीपाल्यावरही कीडीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, शेतकऱ्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे भाजीपाल्याची जोपासणा केली. वाढीव उत्पन्नासाठी दुसरा पर्यायच नसल्याने जीवाचे रान करुन भाजीपाला पदरात पाडून घेतला पण बाजारातील दराबाबत हताश असलेल्या शेतकऱ्यांना कवडीमोल दराने विक्री करण्याची नामुष्की ओढावली आहे.
खरीपात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या चार महिन्यांमध्ये अनेक वेगवेगळे प्रयोग केले आहेत. पण कायम वातावरणातील बदलाचा फटका बसलेला आहेच. हे कमी म्हणून की काय आता भाजीपाल्याच्या घटत्या दरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रु आहेत. किमान खर्च निघण्यासाठी पालकाच्या जुडीला १० ते १२ रुपये मिळणे गरजेचे होते. पण सध्या २ ते ३ रुपये दर मिळत असल्याने ज्या वाहनातून भाजीपाल्याची वाहतूक केली त्याचे भाडेही निघणे मुश्किल झाले आहे.