फळ बागायतदारांना निश्चितच चांगले दिवस येतील: डॉ. आर. जी. सोमकुंवर
‘‘बदलत्या वातावरणामध्ये शेती अवघड होत आहे. अशा स्थितीमध्ये धीर न सोडता शास्त्रीय ज्ञानाची कास धरल्यास फळ बागायतदारांना निश्चितच चांगले दिवस येतील’’, असे मत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. जी. सोमकुंवर यांनी व्यक्त केले.
मंगळवारी (ता. १५) इंदापूर येथे आयोजिलेल्या द्राक्षे, डाळिंब व पेरू चर्चासत्रामध्ये ते बोलत होते. डॉ. सोमकुंवर म्हणाले, ‘‘निसर्गाबरोबरच कोरोनामुळे द्राक्ष बागांतील संकटात वाढ झाली. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शास्त्रीय शिफारशींचा अवलंब केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊ शकेल. द्राक्ष वेलीचे व्यवस्थापन काटेकोरपणे केल्यास फलधारक डोळ्यांची निर्मिती होऊन आगामी फळ छाटणी हंगाम चांगला जाईल.’’
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. ए. मराठे म्हणाले, ‘‘डाळिंब लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड, तेलकट डागमुक्त रोपे, एकात्मिक खत, पाणी याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे.’’
‘‘राज्यामध्ये पेरू लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे. त्यात शिफारशीत पेरू जातींच्या लागवडीवर भर द्यावा’’, असे बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रातील पेरू तज्ज्ञ डॉ. पुरुषोत्तम हेंद्रे यांनी सांगितले. उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, मृदा शास्त्रज्ञ डॉ. अजयकुमार उपाध्याय, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिपेंद्रसिंग यादव, डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. दिनेश बाबू यांनीही मार्गदर्शन केले.