अवकाळीने द्राक्ष शेतकरी उध्वस्त!
उत्पादन वाढीची उरली-सुरली आशा हंगामाच्या अंतिम टप्प्यात झालेल्या अवकाळीमुळे मावळली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा द्राक्ष उत्पादकांनाच झालेला आहे. निफाड, कोळगाव परिसरात तर द्राक्ष बागा जमिनदोस्त झाल्या असून पावसामुळे थेट द्राक्षालाच तडे गेले आहेत. त्यामुळे याचा दरावर परिणाम होणार आहे. हंगामाच्या सुरवातीपासून सुरु झालेली संकटाची मालिक ही अंतिम टप्प्यातही कायम राहिल्याने आता बागांवर झालेला खर्चही पदरी पडतो की नाही अशी स्थिती आहे. खराब झालेल्या द्राक्षापासून बेदाणा उत्पादन घेण्याशिवाय आता शेतकऱ्यांकडे पर्यायच उरलेला नाही. शिवाय नाशिक जिल्ह्यात अजूनही 40 टक्के द्राक्षबागा काढणीच्या प्रतिक्षेत आहेत.
तर निर्यातीवरही परिणाम
द्राक्षाची निर्यात करताना त्याच्या दर्जाची तपासणी केली जाते आणि मगच निर्यातीचा निर्णय घेतला जातो. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठे नुकसान झाले होते. त्याचा परिणाम अजूनही जाणवत आहे. हे कमी म्हणून की काय युक्रेन-रशियाच्या युध्दाचा परिणाम सुरु असतानाच पुन्हा अवकाळीने अवकृपा दाखवलेली आहे. आता याचा थेट परिणाम दरावर आणि निर्यातीवर होणार असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. सध्या द्राक्षाला 30 ते 40 रुपये किलो असा दर आहे पण आता त्यामध्ये 15 रुपयांची घसरण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आता बेदाणा उत्पादनावर भर
द्राक्ष उत्पादनातून जे साध्य झाले नाही ते बेदाण्यातून काय होणार. मात्र, अधिकचा खर्च टाळण्यासाठी आणि खराब झालेल्या द्राक्षाचा उपयोग होण्यासाठी द्राक्ष उत्पादकांचा आता बेदाणा निर्मितीवर भर राहणार आहे. परंतू, त्यासाठीही स्वच्छ सूर्यप्रकाश आवश्यक असतो. पण गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण तर आहेच पण धुक्याचेही सावट आहे. त्यामुळे बेदाणा निर्मिती तर लांबणीवर पडणारच आहे पण या वातावरणाचा परिणाम बेदाण्यावर होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तरीही शेतकरी आशादायी
द्राक्षामध्ये गोडवा उतरण्यासाठी उष्णता वाढीची आवश्यकता असते. शनिवारी दुपारनंतर या भागात अवकाळीचे संकट दूर झाले होते. जर आता कडक ऊन पडले तर द्राक्षामध्ये गोडवा उतरेल. सध्याच्या प्रतिकूल परस्थितीचा परिणाम दरावर होणार असला तरी मार्च-एप्रिलमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली या भागातून द्राक्षाला मागणी असते. त्या दरम्यान तरी चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. तर दुसरीकडे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणीही शेतकऱ्यांमधून होत आहे.