कृषी विभागाच्या साथीने शेतकऱ्यांचा खरीप होणार जोमात
अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होत असतानाच दुसरीकडे कृषी विभागाचे आगामी वर्षात बियाणांची उपलब्धता व्हावी यादृष्टीने प्रयत्न सुरु होते. उत्पादनात घट होणार असल्याने बियाणांची टंचाई भासणार हे कृषी विभागाच्या निदर्शनास आले होते म्हणूनच शेतकऱ्यांनी केवळ उत्पादनावरच लक्ष केंद्रीत न करता सोयाबीन बिजोत्पदान निर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या नियोजनाला साथ देत खरीप आणि आता उन्हाळी हंगामात बिजोत्पादन कार्यक्रम राबवल्याने नागपूर जिल्ह्यामध्ये तब्बल 30 हजार क्विंटल बियाणे राखून ठेवणे शक्य झाले आहे. त्यामुळे आगामी काळात बियाणांची टंचाई भासणार नसल्याचे कृषी विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे पिकांचे नुकसान होत असताना करण्यात आलेले नियोजन आता शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे.
खरीप हंगामात सोयाबीनचे क्षेत्र वाढत असले तरी बिजोत्पादनाकडे शेतकऱ्यांचे कायम दुर्लक्ष राहिलेले आहे. मात्र, भविष्यातील टंचाई लक्षात घेता कृषी विभागाकडून नियोजन हे केले जाते. त्याचअनुशंगाने शेतकऱ्यांनी बिजोत्पादन करावे यासाठी दोन्ही हंगामात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळेच नागपूर जिल्ह्यामध्ये 1 हजार 52 हेक्टरावर बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता. या उन्हाळी सोयाबीनमधून 10 ते 12 हजार क्विंटल तर खरीपातून 25 हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात बाजारपेठेतील बियाणावर अवलंबून राहण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर येणार नसल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
विकतच्या बियाणांबाबत शेतकऱ्यांच्या कायम तक्रारी राहिलेल्या आहेत. एकतर बाजारपेठेतील बियाणांचे दर अधिक असतात शिवाय यामधून सर्वच बाबी प्रमाणात असतात असे नाही. त्यामुळे उत्पादनात घट किंवा सोयाबीनची उगवणच झाली नाही अशा तक्रारी वाढतात. मात्र, कृषी विभागाने महाबीजच्या माध्यमातून केलेली जनजागृती यंदा कामी येणार आहे. शेतकऱ्यांना घरचे बियाणे वापरता येणार असून यातून उत्पादनही वाढेल असा विश्वास आहे.
बिजोत्पादनाच्या दरम्यान बियाणे हे प्रमाणित ठेवण्यासाठी कृषी विभागाने दिलेल्या सूचनांप्रमाणे जोपासणा करणे गरजेचे आहे. शिवाय हेक्टरी किती बियाणे लागणार यावरुनच लागवडीचा कार्यक्रम हा ठरला जातो. त्यानुसार हेक्टरी 100 किलो बियाणे याप्रमाणे प्रमाण ठेऊन यंदा बिजोत्पादनाचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.