मुंबई APMC फळ मार्केट आगीच्या भक्षस्थानी! मार्केटला जवळपास १ लाख लाकडी पेट्यांचा तर गवताचा गराडा
येथे लागलेल्या आगीला जबाबदार कोण?
पदपथावर पेट्या आणि गवताचा साठा ग्राहक आणि हमाला त्रस्त
अग्निशमन दलाकडून वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा APMC प्रशासनाकडून दुर्लक्ष
व्यापाऱ्यांनी आपल्या गाळ्यांवर अग्निशामक यंत्रांना न बसवल्याने भीतीचे सावट
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नियमित आगीच्या घटना घडत असतानाही एपीएमसी प्रशासन अग्नी सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे. हल्ली छोटी छोटी दुकाने आणि कार्यालयांमध्ये अग्निशामक यंत्रणा वापरण्यात येते. परंतू एवढ्या मोठ्या बाजार समितीतील एकही मार्केटमध्ये अग्निशामक यंत्रणा नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर फळ मार्केट परिसर आगीचा आमंत्रक ठरत असून काल रात्री १२ वाजता गवताला आग लागली. घटनास्थळी वाशी अग्निशामक दलाने धाव घेत आग विझवल्याने अधिक हानी टळली.
सध्या फळ मार्केटमध्ये आंबा हंगाम सुरु झाला आहे. सरासरी ३०००० हजार पेटी आंबा बाजारात येत आहे. मात्र मार्केटच्या परिसरात १ लाख लाकडीपेटी तयार करण्याचे काम सुरु आहे. शेकडो टन गवत येऊन पडले आहे. तर हजारो पुठे बॉक्स आंब्यासाठी तयार करण्याचे काम सुरु असल्याने आग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रमजान महिना सुरु असून ग्राहक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. आंबा हंगामातील चार महिन्यात सर्वात जास्त लोकांची वर्दळ फळ मार्केट मध्ये असते. लाकडी पेटी, पुठ्ठा बॉक्स, गवत आणि घास मार्केटमध्ये अनाधिकृतपणे साठून ठेवण्यात येते. मार्केट परिसराला लागून असलेल्या सिडको भूखंडावर देखील लाकडी पेटी बनवण्याचे बेकायदा कारखाने उभारण्यात आले आहेत. शिवाय विजेच्या उच्च दाब (हाय टेन्शन) असेलेल्या तारांखाली या लाकडी पेट्या साठ्यामुळे आगीचा प्रकार घडल्यास हाहाकार उडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. तर आंबा हंगामात दरवर्षी आगीच्या घटना घडत असल्याचे अग्निशमन अधिकारी सांगत आहेत.
शिवाय या ठिकाणी काम करणारे कामगार विडीकाडी पिणारे आहेत. नकळत पेटती विडी सिगारेट गवताजवळ पडल्यास या वस्तूंमुळे मोठी आग भडकू शकते तर काल लागलेली आग अशाचप्रकारे लागली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर आग लागली कि लावली अशी देखील चर्चा फळ मार्केटमध्ये सुरु आहे. या भीषण आगीत मार्केट परिसराची मोठ्या प्रमाणात वित्त तसेच जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे बाजार समितीमधील पुठ्ठा, पेटी आणि गवत व्यापाऱ्यांना मोकळ्या भूखंडावर जागा देण्याची मागणी केली जात आहे. तर पदपथ देखील या पेट्या आणि गवताने भरून गेले आहेत.
आगीसारख्या गंभीर गोष्टीकडे एपीएमसी प्रशासन आणि संचालक मंडळांचे दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एपीएमसी प्रशासन मार्केटची आगीपासून सुरक्षा कशी होणार असा सवाल विचारला जात आहे. महत्वाची आणि आवश्यक असलेल्या अग्नीशामक यंत्रणेला महत्व दिले जात नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. लाकडी पेट्या, पुठ्ठे आणि गवत साठवून ठेवलेल्या जागा मुळ परवानाधारकांनी परप्रांतीयांना भाड्याने दिल्या असून हे लोक पुरेशी काळजी घेत नसल्याचे हि सांगण्यात येत आहे. त्यामुळे अग्निशामक यंत्रणेअभावी राज्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मार्केटची सुरक्षा वाऱ्यावर असून फळ मार्केट आगीच्या भक्षस्थानी असल्याचे सिद्ध होत आहे.
याबाबत लवकरच घटनास्थळाची पाहणी करून योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.