शेतकऱ्यांच्या घरी आली समृद्धी; वाचा सविस्तर
राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वकांक्षी असणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग येत्या वर्षभरात सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळला असून, अनेकांच्या घरात समृद्धी आली. त्यामुळे कोणी घराला, तर कोणी चक्क हॉटेलचेही समृद्धी नामकरण केले. हा भव्यदिव्य प्रकल्प कसा साकारला, याच्या रोचक आठवणी, प्रसंग आणि किस्से राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सांगितले. भविष्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप कसा असेल? राज्यात पायाभूत सुविधा अधिक करण्यासाठी काय करावे लागेल? याचा उलगडा ‘महा-इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’ मधून होतोय. या महा कॉन्क्लेव्हचे उद्घाटन शिंदे यांनी केले. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. तर मग यानिमित्त जाणून घेऊयात मंत्री एकनाथ शिंदे या प्रकल्पाबद्दल काय म्हणाले आणि हा प्रकल्प कसा आहे ते.
समृद्धी प्रकल्पाची माहिती देताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत चक्क एक नव्हे तर २० नवनगरे वसवली जात आहेत. अनेक ठिकाणी कृषीशी संबंधित केंद्र उभारली जात आहेत. त्यामुळे सध्याच अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या ग्रामीण भागाकडे निघाल्यात. येणाऱ्या काळात इतर उद्योगही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात जातील.
मंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही समृद्धी प्रकल्पासाठी जवळपास हजारो एकर जमिनीचे संपादन केली. ती शेतकऱ्यांकडून खरेदी केली. त्याचा योग्य तो मोबदला त्यांना दिला. अनेक शेतकरी जमिनी द्यायला पुढे येत नव्हते. एका ठिकाणी मी गेलो. माझ्या उपस्थितीत हा व्यवहार झाला आणि दोन तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग झाले. त्यामुळे इतर शेतकरीही पुढे आले. त्यांनी जमिनी दिल्या. या प्रकल्पातून अनेकांच्या जीवनात परिवर्तन आले. एका गावात तर शेतकऱ्यांनी चक्क 100 बोलेरो जीप घेतल्या. कोणी हॉटेल उभारले, कोणी घर उभारले. त्यांना नाव समृद्धी दिले.
चांद्यापासून बांद्यापर्यंत जलद वाहतूक डोळ्यांसमोर ठेवून हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारला जातोय. त्यामुळे स्वयंरोजगार, नोकरीच्या संधी, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि इतर आवश्यक सेवांसाठी महाराष्ट्रातील मोठ्या केंद्रांवर सहज जाता येणार आहे. हा महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, औरंगाबाद, जालना, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जात नागपूरला मुंबईशी जोडणार आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठ्या कंटेनर पोर्ट – जेएनपीटीशी थेट संपर्क साधला जाणार आहे. त्यातून पर्यटन ते व्यापार साऱ्याच क्षेत्रात लाभ होणार आहे.
समृद्धी महामार्ग 701 किमी लांबी आहे. तो 10 जिल्हे, 26 तालुके व आसपासच्या 392 गावांना जोडतो. याची गती मर्यादा 150 किमी आहे. त्यामुळे नागपूर व मुंबई हे अंतर 8 तासांत कापले जाईल. मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी 4 तास आणि औरंगाबाद ते नागपूर 4 तास वेळ लागेल. या मार्गामुळे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर (डीएमआयसी), वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (डब्ल्यूडीएफसी), वर्धा व जालना कोरडे बंदरे आणि मुंबईच्या जेएनपीटीला जोडली जातील.
समृद्धी महामार्गावर सुमारे 50 हून जास्त उड्डाणपूल, 24 हून जास्त इंटरचेंज, 5 पेक्षा जास्त बोगदे, 400 पेक्षा जास्त वाहने आणि 300 पेक्षा जास्त पादचारी मार्ग अंतर्गत मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे रहदारीचा त्रास न आणता एक्स्प्रेस वे सोडताना किंवा सामील वाहनांसाठी अंडरपास आणि उड्डाणपूल फायदेशीर ठरतील. शिवाय हा एक झीरो फॅटॅलिटी महामार्ग असेल यामध्ये प्रत्येक 5 किमीवर सीसीटीव्ही पाळत ठेवणे व विनामूल्य टेलिफोन बूथ असतील जेणेकरून अपघात व आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदत मिळू शकेल. एक्सप्रेस वेसह युटिलिटी महामार्ग ओएफसी केबल्स, गॅस पाइपलाइन, विजेच्या लाईन इत्यादी पुरविल्या जाणार आहेत.
प्रकल्पातील प्रमुख जिल्हे
नागपूर
वर्धा
अमरावती
वाशिम
बुलढाणा
औरंगाबाद
जालना
अहमदनगर
नाशिक
ठाणे