उदगीर येथे तीन सोयाबीन प्लांट; सोयाबीन दर वाढीची शक्यता
मराठवाड्यातच नव्हे तर सबंध राज्यात सोयाबीनची मुख्य बाजारपेठ म्हणून लातूरची वेगळी अशी ओळख आहे. येथील सोयाबीनच्या दरावरच इतर बाजार समित्यांचे दर ठरतात. यातच जिल्ह्यासह लगत असणाऱ्या कर्नाटकच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील उदगीर येथे एक नव्हे तर एकाच वेळी तीन सोयाबीन प्लांट सुरु होणार आहेत. म्हणजेच एकाच वेळी तीन प्रक्रिया उद्योग उभारले जाणार आहेत. लातूरातील सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे सोयाबीनचे दर सावरण्यासाठी चांगलाच उपयोग होतो. आता लातूर प्रमाणेच उदगीर या बाजारपेठेतही हे उद्योग उभारले जाणार असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ तर होणारच आहे पण शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. पुढील हंगामापासून सोयाबीन उत्पादक शेतकरी बाजारपेठेत सोयाबीन विक्री करण्याऐवजी थेट सोयाबीन प्लांटला विक्री करतील असे चित्र तालुक्यात बघायला मिळत आहे. उदगीर तालुक्यात, बामणी पाटी, करडखेल पाटी व उदगीर शहराजवळील नळेगाव रस्त्यावर सोया प्लांट उभारले गेले आहेत.
बाजार समितीप्रमाणेच प्लांटला महत्व
सध्या एकीकडे बाजार समितीमधील व्यवहार आणि खासगी प्लांट धारकांचे व्यवहार एक समानच असतात. व्यापारी सौदे पध्दतीने शेतकऱ्यांचा माल खरेदी करतो पण सोयाबीनची साठवणूक करुन पुन्हा तो प्लांट धारकांना विकला जातो. लातूर शहरातील प्लांट धारकांची जिल्ह्यात सर्वदूर खरेदी केंद्र आहेत. त्यामाध्यमातून बाजारेभावापेक्षा अधिक पण कमी अशा पध्दतीने शेतीमालाची खरेदी होते. एखाद्या उपबाजार समितीप्रमाणे या प्लांटचे व्यवहार हे सुरु असतात.त्याच धर्तीवर आता उदगीरमध्ये हे प्लांट सुरु होत आहेत.
शेतकऱ्यांचा तपशील व्यापाऱ्यांकडे
उदगीरमध्ये तीन सोयाबीन प्लांट वर दिवसाला पंधरा हजार क्विंटल सोयाबीनची प्रक्रिया होणार आहे. यामुळे या तिनी प्लांटच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादकांच्या घरी जाऊन त्यांच्याकडून त्यांचे नाव, मोबाईल नंबर, बँक खाते व इतर तपशील जाणून घेतला आहे.या सोयाबीन प्लांट वर बाजारपेठेपेक्षा अधिक दर मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पुढील हंगामात उदगीर एपीएमसीमध्ये सोयाबीनचा अकाल पडणार असून सोया प्लांट वर शेतकरी बांधव सोयाबीन विक्री करताना बघायला मिळू शकतात.
शेतकऱ्यांना नेमका फायदा काय ?
सोया प्लांट मालक सोयाबीनची खरेदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करतील असे सांगितले जात आहे त्यामुळे शेतकरी बांधव सोयाबीनची विक्री सोया प्लांट कडेच अधिक करतील असा व्यापाऱ्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे उत्पादकांना अच्छे दिन तर येतीलच पण ते टिकवून ठेवणे गरजेचे आहे. शिवाय रोख व्यवहार आणि अधिकचा दर असा दुहेरी फायदा उत्पादकांना होणार आहे.