Agriculture Research :शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्यांचे संशोधन गरजेचे-डॉ. इंद्र मणी मिश्रा
Farmers News : जागतिक तापमान वाढ झाली आहे. पावसाचा पॅटर्न बदलला आहे. अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, दुष्काळ, गारपीट, कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. हवामान बदलांमुळे शेती व्यवसायापुढे विविध आव्हाने निर्माण झाली आहेत. या परिस्थितीत त्या-त्या भागांतील स्थानिक शेतकऱ्यांच्या समस्यांचा अंतर्भाव करुन शाश्वत शेतीसाठी आवश्यक बाबींवर संशोधनावर भर द्यावा लागेल.
अन्न सुरक्षेसोबत पोषणमूल्य सुरक्षा, माती, पाणी आदी नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन, शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, सूक्ष्म सिंचन, संरक्षित, काटेकोर शेती या यावरील संशोधनावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
असा सूर सोमवारी (ता. ७) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व केंद्रिय विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित ‘हवामान बदलांच्या स्थितीत शाश्वत शेती संशोधन’ या विषयावरील विचार मंथन कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा अध्यक्षस्थानी होते. जुनागढ कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. आर. पाठक, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किशनराव गोरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही. एम. मायंदे, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. जे. एस. पनवार, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक महासंचालक डॉ. जितेंद्र कुमार, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अखिलेश मिश्रा, डॉ. के. एन. तिवारी, डॉ. सय्यद ईस्माईल, डॉ. डी. पी. वासकर, डॉ. डी. एन. गोखले, डॉ. डी. बी. देवसरकर, डॉ. उदय खोडके आदीची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मिश्रा म्हणाले, की शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरण करणारे संशोधन करावे. त्यासाठी गरज पडल्यास निधी दिला जाईल. डॉ. गोरे म्हणाले, हवामान बदलाच्या स्थितीत निविष्ठांचा इष्टतम वापर, संरक्षित शेती, उत्पादनक्षम ते नफ्याची शेती यादृष्टीने शेती तंत्रज्ञानात सुधारणा कराव्या लागतील.
डॉ. मायंदे म्हणाले, की पावसाचे प्रमाण, अतिवृष्टी, पावसाच्या खंडाचे दिवस वाढले आहेत. तापमानातील वाढीमुळे गहू, सोयाबीन आदी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अन्नसुरक्षेसह पोषण मूल्याच्या सुरक्षितता यासह शाश्वत शेतीसाठी सामाजिक, आर्थिक राष्ट्रीय अंगानी संशोधन करावे लागेल. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
डॉ. इंद्र मणी म्हणाले, परभणी कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांच्या गरजावर आधारित तंत्रज्ञान विकसित केलेले तंत्रज्ञान व तूर, सोयाबीन, कपाशी आदींसह विविध पिकांचे एकाहून सरस वाणांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानामुळे पिकांना जास्त पाणी लागते. उत्पादनात घट येते. जिरायती क्षेत्रापुढे निर्माण झालेल्या आव्हानांची उकल करण्यासाठी यापुढील संशोधनाचा भर राहील.