Onion Damage : साठविलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी धोक्यात
 
 
Summer Onion : चालूवर्षी उन्हाळ कांदा हंगाम शेतकऱ्यांसाठी अस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटांनी अडचणीत आणणारा ठरला आहे. वातावरणीय बदलांमुळे साठवणूक क्षमतेवर परिणाम झाला. परिणामी कांद्याची वाढलेली सड आणि फुटलेल्या कोंबामुळे आता प्रतवारी धोक्यात आली आहे. त्यामुळे कांदा उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होणार आहे.
गत रब्बी हंगामात नाशिक जिल्ह्यात २ लाख २० हजार ८६४ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांदा लागवडी झाल्या होत्या. मात्र वाढीच्या अवस्थेत कांद्यावर करपा या बुरशीजन्य रोगाचा तर किडीमध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढला. परिणामी पीक संरक्षण खर्च वाढला.
त्यातच काढणीकाळात वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपिटीमुळे ३५ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात सटाणा, कळवण, मालेगाव, चांदवड, येवला, सिन्नर, नांदगाव, देवळा व निफाड तालुक्यांत नुकसान अधिक होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा साठवणूक होण्यापूर्वीच सडला.
तापमान वाढीमुळे चाळीत साठविलेला जवळपास ४० टक्के कांदा सडला. आता थोड्या शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक आहे. प्रत्यक्षात साठवणूकपश्चात ५० टक्के नुकसान असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान शेतकऱ्यांचा कांदा विक्रीतून उत्पादन खर्चही वसूल झालेला नाही.
ऑगस्टमध्ये दरात सुधारणा होत असतानाच केंद्र सरकारने ४० टक्के निर्यातशुल्क लागू करून कांदा बाजारावर नियंत्रण आणल्याने शेतकरी अडचणीत आले. त्यानंतर १३ दिवस बाजार बंद राहिल्याने कांदा विक्रीशिवाय तुंबल्याने सड वाढली.
त्यामुळे शेतकऱ्यांकडे जो थोडा कांदा शिल्लक आहे, त्यात वजनातील घट व सडून झालेले नुकसान बघता एकूण उत्पादनाच्या ३० ते ४० टक्के मालाची विक्री होऊ शकेल, असे शेतकरी घनश्याम पवार यांनी सांगितले.
काढणीपश्चात साठवणूक वयोमान संपुष्टात
काढणीपश्चात कांद्याचे साठवणूक वयोमान संपुष्टात आले आहे. त्यामुळे काही ठिकाणी कांद्याची सड व कोंब येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्याने कांदा विक्री करणे फायद्याचे ठरेल. काही शेतकऱ्यांचा कांदा चांगला असल्यास, त्यांनी विक्रीचा निर्णय घ्यावा, असा सल्ला ज्येष्ठ कांदा पीक शास्त्रज्ञ डॉ. सतीश भोंडे यांनी दिला.