Organic Farming : महात्मा फुले कृषी विद्यापीठात सेंद्रिय शेतीचे प्रयोग
 
Organic Farming : रासायनिक निविष्ठांच्या असंतुलित वापराचे माती, शेती, पर्यावरण आदींवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. रासायनिक निविष्ठांच्या किमतीही वाढल्या आहेत. साहजिकच अलीकडील काळात सेंद्रिय शेती व अन्नाचे महत्त्व वाढले आहे.काळाची गरज लक्षात घेऊन राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठानेही २०१८ मध्ये सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. विद्यापीठ प्रक्षेत्रात १८ हेक्टर २० गुंठे क्षेत्रावर त्याची व्याप्ती आहे.कुलगुरु डाॅ. प्रशांतकुमार पाटील, संशोधक संचालक डॉ. सुनील गोरंटीवार व कृषी विद्या विभागाचे प्रमुख डाॅ. आनंद सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राचे प्रकल्प सहसमन्वयक म्हणून डाॅ. उल्हास सुर्वे जबाबदारी सांभाळत आहेत. सेंद्रिय शेती सुरू करून तीन वर्षे पूर्ण झाली असून, एका प्रमाणीकरण संस्थेकडून प्रमाणीकरणही झाले आहे.
केंद्रातील प्रयोग
- दहा ते वीस गुंठ्यांवर काही प्रयोग. काही क्षेत्रावर सघन पद्धतीने मिश्र फळबाग पद्धत घेतली आहे. त्यात सावलीत येणारी हळद, आले यांसारखी पिके घेतली आहेत.
- सोयाबीन, तूर, हरभरा, गहू, कांदा, ऊस, आवळा, शेवगा तसेच फळपिकांमध्ये केळी, आंबा, अंजीर, डाळिंब, बोर, द्राक्ष, मोसंबी, पपई आदींची लागवड. पेरू (सरदार) व सीताफळ (फुले पुरंदर व बाळानगर) प्रत्येकी पाच एकरांवर.
-खरिपात वीस गुंठ्यांवर ताग, धैंचा आदी हिरवळीच्या पिकांची लागवड व जमिनीत ते गाडल्यानंतर रब्बीची पिके घेतली.
-तीन वर्षांच्या प्रयोगात ऊस, मका व गहू ही पिके वगळता अन्य पिकांच्या उत्पादनात १२ ते १५ टक्के वाढ दिसून आली आहे. मातीतील जिवाणूंची संख्या वाढली आहे.
केसर आंब्याची विक्री
एक हेक्टरवर केसर आंब्याची सुमारे २६० झाडे लावली आहेत. मागील वर्षी व्यापाऱ्यांनी ६५ हजारांना बाग घेण्याची मागणी केली. मात्र सेंद्रिय उत्पादन असल्याने टिकवणक्षमता, स्वाद यांचा दर्जा चांगला होता.
त्यामुळे विद्यापीठ प्रक्षेत्रात तसेच शिर्डी-नगर रस्त्यावर थेट ग्राहकांना विक्री केली. त्यातून सव्वातीन लाख रुपयांचे उत्पन्न विद्यापीठाला मिळाले. शिवाय ग्राहक बाजारपेठ तयार झाली.
बीजोत्पादन
शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीत दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे असा केंद्राचा प्रयत्न आहे.
त्यातूनच दरवर्षी एकूण क्षेत्रातून सोयाबीनचे ७६ क्विंटल, हरभरा ५६ क्विं., हळद ५ क्विं. व आले ३ टन याप्रमाणे बीजोत्पादन घेण्यात आले आहे. एका वर्षी कांद्याचे बीजोत्पादनही घेण्यात आले.