टनाला ४०० द्या, राजू शेट्टींच्या नेतृत्वात उद्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडकणार मोर्चा
Kolhapur Sugarcane Farmers : सध्या साखरेला चांगला भाव मिळत आहे. यामुळे साखर कारखानदारांनी टनाला ४०० रुपये प्रमाणे दुसऱ्या हप्त्या तत्काळ द्यावा, तसेच सर्व साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करण्यात यावेत व शेतकऱ्याला न्याय मिळावा. याचबरोबर ऊस वाहतुकदारांच्या समस्या सोडवाव्यात या आणि अन्य मागण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात उद्या (ता. १३) तारखेला कोल्हापूर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
मागच्या काही दिवसांपूर्वी माजी खासदार राजू शेट्टी यांनी उसाला दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये प्रमाणे द्यावे अशी घोषणा केली. दरम्यान साखर कारखान्यांना हे देण्यास भाग पाडण्यासाठी राजू शेट्टी कोल्हापूर जिल्हा साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. यासाठी शेट्टी यांनी मागचा एक महिना गावोगावी फिरून जनजागृती केली आहे.
साखर कारखानदारांना जाब विचारा
माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील गावागावांमध्ये जाऊन सभा घेत या मोर्चाला आवाहन केले आहे. यामुळे उद्याच्या होणाऱ्या मोर्चाला हजारोंची उपस्थिती असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान शेट्टी यांनी साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांना शेतकऱ्यांना उपस्थित राहून कारखानदारांना जाब विचारण्याचे आवाहनही केले आहे.
यंदा साखरेला चांगला भाव मिळाला आहे. त्यामुळे साखर कारखानदारांकडे पैसा शिल्लक राहिला आहे. एसआरपीपेक्षा जादा ऊसदर दिल्याखेरीज साखर कारखान्यांची धुराडी या हंगामात पेटवू दिले जाणार नाहीत, मागच्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये का दिला नाही, याबद्दलही जाब शेतकऱ्यांनी विचारावा असे आवाहन केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात ऊस दरावरून संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकरी
माजी खासदार राजू शेट्टी यांचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ऊस पट्ट्यात मोठा गट आहे. यामुळे शेट्टी यांनी गावोगावी जात शेतकऱ्यांमंध्ये जनजागृतीकरत १३ तारखेच्या मोर्चाला येण्याचे आवाहन केले. तसेच गावपातळीवर संघटेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच घरोघरी जात मोर्चाला येण्याचे आवाहन केले आहे. यामुळे उद्याच्या होणाऱ्या मोर्चाला मोठी गर्दी होणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्याच्या ऊस दर परवडत नाही
मागच्या काही वर्षात खतांच्या किंमती भरमसाठ वाढल्याने शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे. वाढणाऱ्या खतांच्या किंमती तसेच डिझेलचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. उसाला एकरकमी ३ हजार रुपये मिळूनही शेतकऱ्याला उसनवारी करावी लागत असल्याने शेतकऱ्यांमध्येही असंतोषाचे वातावरण आहे.