डाळिंबाच्या दराला ‘करपा’! ₹२०० वरून थेट ₹६०-७०, जतच्या बागायतदारांचे अर्थचक्र कोलमडले
आवक वाढली, बाजारभाव घसरला ‘तेल्या’ रोगानेही शेतकऱ्यांच्या अडचणीत भर
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमी पाणी आणि खडकाळ जमिनीतही चांगले उत्पादन देणाऱ्या डाळिंब शेतीला नगदी पीक म्हणून पसंती दिली. ठिबक सिंचन, शेततळी आणि कूपनलिकांच्या माध्यमातून उजाड माळरानावर डाळिंबाच्या बागा फुलवण्यात आल्या. मात्र, गेल्या चार वर्षांत प्रथमच यंदा डाळिंबाच्या दरात मोठी घसरण झाल्याने बागायतदार आर्थिक संकटात सापडले आहेत.
दरीबडची, उमदी, सोन्याळ, संख, जाडरबोबलाद, उटगी, सिद्धनाथ, आसंगी, दरीकोणूर, वाळेखिंडी आणि काशीलिंगवाडी परिसरात डाळिंबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. बिब्या, लालकुळी, करपा आणि फुलगळ यांसारख्या रोगांचा सामना करत शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादन घेतले. मागील चार-पाच वर्षांत डाळिंबाला १०० ते २५० रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत होते.
मात्र, यंदा बाजारातील परिस्थिती बदलली. राज्यातील डाळिंब उत्पादक मृग, हस्त आणि आंबे बहार अशा हंगामांमध्ये उत्पादन घेतात. यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आंबे बहार घेतल्याने बाजारात एकाचवेळी डाळिंबाची आवक वाढली. त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला.
जूनमध्ये सरासरी १९० ते २०५ रुपये असलेला दर जुलैमध्ये १६० ते १८० रुपयांवर, ऑगस्टमध्ये ५० ते ६० रुपयांवर घसरला. सप्टेंबरमध्ये दर ७० ते ८० रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे.
‘तेल्या’ रोगानेही वाढवली चिंता
बाजारभावातील घसरणीबरोबरच डाळिंब बागांमध्ये ‘तेल्या’ रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. गतवर्षीचा हंगामही अपेक्षेप्रमाणे न गेल्याने उत्पादन खर्चाचा मोठा भार शेतकऱ्यांवर आहे. त्यामुळे यंदाच्या कमी दरामुळे डाळिंब उत्पादकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.