कृषी अधिकाऱ्याची दादागिरी उघड! तक्रार केल्याचा राग काढत शेतकऱ्याला मारहाण, बूट उगारून शिवीगाळ
कृषी अधिकाऱ्याची दादागिरी उघड! तक्रार केल्याचा राग काढत शेतकऱ्याला मारहाण, बूट उगारून शिवीगाळ
वाशिम | वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातून शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा प्रश्न निर्माण करणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नेमलेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यानेच थेट शेतकऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेत तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शेतकरी ऋषिकेश पवार यांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे.
वादाचे मूळ कारण काय?
पीडित शेतकरी ऋषिकेश पवार यांनी मनरेगा (MGNREGA) अंतर्गत फळबाग लागवड केली होती. मात्र, या कामाची मजुरी व अनुदान मागील काही महिन्यांपासून रखडले होते. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी जिल्हा स्तरावर तक्रार दाखल केली.
या तक्रारीमुळे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर प्रशासकीय दबाव वाढला होता. याच तक्रारीचा राग मनात धरून अधिकाऱ्याने शेतकऱ्याशी आक्रमक वर्तन केल्याचा आरोप केला जात आहे
पाहणीदरम्यान संतापाचा उद्रेक
सचिन कांबळे हे गोगरी शेत शिवारात पाहणीसाठी आले असताना शेतकरी ऋषिकेश पवार मोबाईलवर संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओत टिपत होते. हे पाहताच अधिकाऱ्यांचा पारा चढला.
“व्हिडिओ का काढतोस?” असा सवाल करत त्यांनी शेतकऱ्याचा मोबाईल हिसकावून घेतला.
यानंतर तक्रारीचा राग मनात धरून अधिकाऱ्याने थेट शेतकऱ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे यांनी शेतकऱ्याच्या अंगावर धाव घेत बूट उगारला आणि अश्लील शिवीगाळही केली.
कठोर कारवाईची जोरदार मागणी
या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कृषी अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबन व कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटना आणि नागरिकांकडून केली जात आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी नेमलेले अधिकारीच जर दादागिरी करत असतील, तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.