कोल्हापुरी गुळाच्या दरात तेजी; गतवर्षीपेक्षा 200 ते 300 रुपये भाववाढ
कोल्हापुरी गुळाला देशभरात मागणी असल्याने शाहू मार्केट यार्डात गुळाला चांगला दर मिळत आहे. नव्या वर्षात गुळाच्या आवकेत वाढ होऊनही दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी विस्कळीत झालेले सौदे नियमित सुरू झाल्याने दरात तेजी येत आहे. त्यामुळे गुळाचा जावक मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या गुळाचा सरासरी भाव ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २०० ते ३०० रुपये भाववाढ आहे.
गूळ उत्पादक शेतकरी बाजीराव पाटील म्हणाले की, "यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत २०० ते ३०० रुपयांनी भाव वाढला आहे. पण, मोजकाच गूळ बाजारात येत आहे. त्याचा मोजक्याच शेतकऱ्यांना लाभ होत आहे. साखरेचे मिश्रण न करता गूळ बनवला तर गुळाला आणखी चांगला भाव मिळणार आहे. गूळ बनवण्यासाठी कामगारांची संख्या अपुरी आहे. मजुरी वाढली आहे". अशी माहिती पाटील यांनी दिली.
अपुरे मनुष्यबळ, वीज दरवाढ, वाहतुकीचा खर्च वाढता आदी कारणाने जिल्ह्यातील गुऱ्हाळ घरांची संख्या घटली आहे. यातून सध्या जेमतेम १३० गुऱ्हाळ घरांवर गुळाचे उत्पादन होते तेथे गूळ बाजारपेठेत येतो. गेल्या पाच वर्षांत गुळाला सरासरी भाव ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये होता.
तो भावही परवडत नसल्याने जेमतेम उत्पादन घेऊन गुऱ्हाळ घरे हंगामात लवकर संपवली जात आहेत. यात काही गूळ उत्पादकांनी गूळ बनविताना साखर मिश्रित केल्याने भाव कमी मिळत होता. यातून व्यापारी गूळ उत्पादकांत वाद होत होते. या साऱ्यातून गूळ उद्योगात मरगळ आली होती.
मागील २ वर्षांत मात्र बाजारपेठेत दर्जेदार गुळाला चांगला भाव मिळत आहे. त्यानुसार यंदाच्या हंगामात १४ लाख ५९ हजार गूळ रव्यांची बाजारपेठेत आवक झाली. त्याचेही सौदे नियमित सुरू आहेत. गुजरातमधून कोल्हापुरी गुळाला मागणी मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
उत्तर भारतातील चंदीगड, लखनौ, हरियाणा भागातील गुळाचे उत्पादन घटले आहे. तेथील गूळ गुजरातमध्ये येण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गुजरातमधून कोल्हापूर गुळाला मागणी आहे. त्यामुळे सौद्यात गुळाला चांगला भाव मिळण्यास मदत झाली.