नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचं तांडव, 24 तासात 24 जणांचा मृत्यू, मृतकांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश कारण काय?
 
  राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नेमकं कामकाज कसं चालतं? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कल्याणच्या रुक्मिणीबाई शासकीय रुग्णालयात एका गर्भवती महिलेला दाखल न केल्याने रुग्णालयाच्या गेटवर तिची प्रसूती झाल्याची माहिती समोर आली होती. त्याआधी काही महिन्यांपूर्वी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात भंडारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात आगीमुळे 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
या सगळ्या घटनांमधून प्रशासनाने काहीच धडा घेतलेला नसल्याचं दिसत आहे. कारण शासकीय रुग्णालयांमध्ये होणाऱ्या मृत्यूच्या घटना वाढताना दिसत आहेत. नांदेडमध्ये तर अतिशय धक्कादायक घटना घडलीय. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे.
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झालाय. यात गंभीर बाब म्हणजे मृतकांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मृतांच्या नातेवाईकांना या प्रकरणावरुन प्रशासनावर संताप व्यक्त केल्या. तर दुसरीकडे या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता एस आर वाकोडे यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा समावेश होता, असा दावा केलाय.
प्रशासन काही ठोस पावलं उचलणार का?
संबंधित घटना अतिशय गंभीर आहे. त्यामुळे या घटनेनंतर आरोग्य प्रशासन काही ठोस पाऊल उचलतं का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाकडून योग्य कारवाई होणं अपेक्षित आहे. सरकारने या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे. एकाच दिवशी रुग्णालयातील 24 रुग्ण दगावणं हे किती धक्कादायक आहे. रुग्णांना खरंच वेळेवर औषध मिळालं नाही का? याची चौकशी होणं अपेक्षित असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.