कोरोनानंतर M-Pox व्हायरसचा कहर, 116 देशांमध्ये वेगाने प्रसार; काय आहेत लक्षणे?
कोरोना महामारीचा काळ आठवला की आजही ते दिवस नकोसे वाटतात. कोरोना साथीतून जग आता पूर्णपणे सावरलं आहे. मात्र आता एक नवं संकट समोर आलं आहे. मंकी पॉक्स (M-Pox) पाय पसरायला ससुरुवात केली आहे. मंकी पॉक्सचा विषाणू 100 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एम-पॉक्स विषाणूचा कहर पाहता आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. अनेक देशांमध्ये मंकी पॉक्सच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
WHO ने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. Mpox देखाल संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे परिस्थिती बिघडू नये यासाठी डब्लूएचओने नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आतापर्यंत अनेक लोकांमध्ये याचा संसर्ग दिसून आला आहे.
मंकी पॉक्सचा धोका लक्षात घेता WHO ने तीन वर्षांत दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर केली आहे. यापूर्वी 2022 मध्येही याचा वेगाने प्रसार दिसून आला होता. विषाणूने 100 हून अधिक देशांमध्ये कहर केला होता. त्यावेळी 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
14 हजारांहून अधिक रुग्ण आढळले काँगोमध्ये आतापर्यंत 14 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 15 वर्षांखालील मुलीही या विषाणूचा बळी ठरत आहेत, ही चिंतेची बाब आहे.
WHO ने नेमकी काय माहिती दिली ?
आफ्रिकेत जो संसर्ग पसरला त्याला शारीरिक संबंध हे प्रमुख कारण आहे. समलिंगी पुरुषांमध्ये या संसर्गाचं प्रमाण अधिक आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातले आरोग्य कर्मचारी, कुटुंबीयांना देखील याचा धोका आहे. संसर्ग झाल्यानंतरही अंगावरील पुरळ पूर्ण बरे होईपर्यंत इतरांपासून दूर रहावं. संसर्गबाधित व्यक्तींनी बरं झाल्यानंतरही 12 आठवडे शारीरिक संबंधावेळी कंडोमचा वापर करावा, असं WHO ने म्हटलं आहे.
-मंकी पॉक्सची लक्षणे
मंकी पॉक्समुळे ताप, पुरळ, डोकेदुखी, अंगाला सूज येणे,पाठदुखी, अंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात.
-मंकी पॉक्सचा संसर्ग कसा पसरतो?
-संसर्गग्रस्त रुग्णाचे कपडे वापरले किंवा स्पर्श केला.
-संसर्गाने आलेले फोड किंवा खपलीला स्पर्श केला.
-बाधित व्यक्तीचा खोकला किंवा शिंकेतून.
-बाधित व्यक्तीसोबत शरीरसंबंध ठेवले.