Grape Farming : फळधारणा होईना त्यात पाण्याअभावी बागा वाळू लागल्या परिणामी द्राक्षबागांवर शेतकऱ्यांची कुऱ्हाड
जत पूर्व भागात उन्हाळ्यात द्राक्षे बागांना पाणी कमी पडल्याने काड्या तयार झाल्या नाहीत. पाणी व ऊन समप्रमाणात न मिळाल्याने अपेक्षित फळधारणा झाली नाही. तर काही बागा पाण्याअभावी वाळून गेल्या आहेत. त्यामुळे आता द्राक्ष उत्पादक शेतकरी बागा काढून टाकत आहे.
सध्या अनेकांच्या शेतात बागांचे सागांडेच फक्त शिल्लक राहिले आहेत. ज्यामुळे बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. तर बँका, खासगी सावकार, विकास सोसायट्याकडून काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होत आहे.
सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यात ६ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थिती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. ज्याकरिता शेतकऱ्यांनी शेततळी देखील बांधली आहेत.
परिणामी पाण्याचा नियोजनबद्धा वापर करून दर्जेदार द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्याखाण बेदाण्याची निर्मिती केली जात आहे. मात्र जत पूर्व भागात गेल्यावर्षी कमी पाऊस झाला.
खरड छाटणी पाण्याअभावी रखडली. टँकरने पाणी घालून बागा जगविल्या आहेत. परंतु, फळधारणा झाली नाही. त्यामुळे आता शेतकरी बागा वाळल्याने काढून टाकू लागला आहे.
कर्जाची परतफेड कशी होणार?
पाण्याअभावी बागा वाळून गेल्याने बागेवर काढलेल्या सोसायटी बँकांच्या व खासगी सावकार कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न आता सतावतो आहे.
द्राक्ष उत्पादनही घटणार
पाण्याअभावी बागेची खरड छाटणी जून, जुलै महिन्यांत घेतल्या. खरड छाटणीवेळी पाणी कमी मिळाले. अपेक्षित फळधारणा झाली नाही. कमी द्राक्ष घड असल्याने उत्पादन घटणार आहे. त्याचा फटका उत्पादन व बेदाणा निर्मितीला बसणार आहे.