मुंबई APMC मार्केटमधून सणासुदीसाठी ब्रॅण्डेड खाद्य तेल घेताय सावधान ? खाद्यतेलात इसेन्स टाकून केली जातेय विक्री!
नवी मुंबई : नवी मुंबई APMC परिसरात खाद्यतेल ,मसाला व कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करून विक्री केली जात आहे ,या भेसळखोरांसाठी अन्न औषध प्रशासनाने अभय योजना आणल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडे   त्याची धुरा सोपवण्यात आली असून , या योजनेतुन हित देखील जोपासले जात असल्याची चर्चा बाजार समितीमध्ये होत आहे . यामुळेच कि काय, पूर्ण APMC परिसरात अनेक ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ बनवण्यात येत असून मार्केट मध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येत आहेत. त्यामुळे अन्न औषध प्रशासन अधिकारी जाणून बुझून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे का? अशी चर्चा होऊ लागली आहे . भेसळ करणाऱ्याकडून मार्केट व गोदामनिहाय महिन्याला बिदागी गोळा करून त्यातून अन्न औषध प्रशासन अधिकारी कटुंबासाठी कल्याण योजना राबवत असल्याची चर्चा बाजार आवारात सुरु आहे . त्यामुळे अन्न औषध प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे .
प्रत्येक घरात जेवणामध्ये व सणासुदीला उपवासांच्या विविध पदार्थांमध्ये खाद्यतेलाचा वापर असतो. सध्या श्रावण सुरू असल्याने बहुतांश घरात उपवास सुरू आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी, बटाटा चिप्स, किंवा साबुदाना पापड, असे उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी शेंगदाणा तेलाची मागणी वाढली आहे . हेच तेल तुमच्या जीवाशी तर खेळ करत नाही ना ? हे तपासणंही आता तितकंच गरजेचं झालं आहे .
नवी मुंबई एपीएमसी मधील दाणा मार्केट समोर प्लॉट नंबर २० येथील   एका गोडाऊन मध्ये भेसळीचे तेल बनवून विक्री केली जात असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांना मिळाली होती .हीच संधी साधून पाम तेलात   इसेन्स टाकून त्याचे रूपांतर इतर ब्रान्डेड तेलात करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश नवी मुंबई गुन्हे शाखेने केला आहे. सदर   ठिकाणी छापे   टाकल्यावर पोलिसही चक्रावले . या ठिकाणी पाम तेलाचे अनेक पिंप होते. याच पाम तेलावर प्रक्रिया करून मागणी प्रमाणे तेल बनवले जात होते. शेंगतेल बनवण्यासाठी ४ टन पामतेलामध्ये अर्धा लिटर केमिकलयुक्त इसेन्स टाकले जाते, व त्यातून गुजरात व सोना या ब्रान्डचे शेंगतेल बनवले जात होते. तसेच राईचे तेल बनवण्यासाठी ४ टन पामतेलामध्ये १ बॉटलं केमिकलयुक्त इसेन्स टाकून केशव नावाच्या ब्रान्डचे तेल तयार केले जात होते.
मोहरीचे तेल असो वा सूर्यफूल किंवा शेंगदाणा तेल असो. त्या त्या पदार्थाच्या वासाचे इसेन्स टाकून पाम तेलावर प्रक्रिया करून अतिशय गलिच्छ पद्धतीने हे खाद्य तेल बनवले जात होते. धक्कादायक बाब म्हणजे नामांकित खाद्यतेल कंपन्यांचे रिकामे पॅकेट , बाटल्या, आदि साहित्य या ठिकाणी होते. त्यात हे भेसळीचे तेल भरून मुंबई APMC सह राज्यातील अनेक ठिकाणी तसेच गुजरात मध्येही पाठवले जाते. 
मागील अनेक वर्षांपासून हा उद्योग सुरू होता. या पूर्वी याच गोदामातून   अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी सर्व तेलाचे नमुने घेतले होते, मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आता गुन्हे शाखेने कारवाई करुन अन्न औषध प्रशासनाच्या ताब्यात दिले आहे. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी भेसळयुक्त तेलाचे नमुने   फॉरेन्सिक मध्ये पाठवतात,   मात्र जे अहवाल येतात त्यावर भेसळ करणाऱ्या संबंधित व्यक्ती व कंपनीवर गुन्हा नोंद होऊन ते सील करण्यात आले नाही आता पण अहवाल येई पर्यंत सर्व भेसळयुक्त   तेल राज्यात आणि बाजारात विक्री होईल .अन्न औषध प्रशासनाने सदर गोडाऊन सील केलंच पाहिजे, मात्र काही ठिकाणी चोरी चुपके वाहनांद्वारे तेलाची वाहतूक होत आहे .   त्यामुळे अन्न औषध प्रशासनाची कारवाई कामापूरती असल्याची व शिंदे फडणवीस सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची चर्चा बाजारात होत आहे   .