दादर ज्वारीला परराज्यात मागणी वाढली!
नवी मुंबई : कोरडवाहू दादर ज्वारीसाठी (Dadar Jowar) संपूर्ण खानदेश प्रसिद्ध आहे. दिवाळीनंतर ही पेरणी (Jowar Sowing) करण्याचा प्रघात आहे. कारण या काळात चांगला वाफसा असतो. शेतकरी पारंपरिक वाणांनाच (Jowar Variety) पसंती देतात.कृषी विभागाच्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात मागील तीन हंगामात सरासरी १८ हजार, धुळे चार हजार तर नंदुरबारात अडीच हजार हेक्टरवर या दादरचे क्षेत्र होते.
जळगावमधील आसोदे, भादलीची दादर राज्यभर प्रसिद्ध आहे. तापी, गिरणा, पांझरा, अनेर आदी नद्यांच्या क्षेत्रात काळ्या कसदार जमिनीत पेरणी होते.
अलीकडे सिंचनाच्या सुविधा झाल्याने क्षेत्र कमी झाले. शेतकरी सुधारित, संशोधित वाणांकडे वळले. तरीही ३५ ते ४० वर्षे खानदेशातील शेतकऱ्यांनी दादरची परंपरा टिकवली आहे. दादर ज्वारी जवळपास रासायनिक अवशेषमुक्तच असते.
दादरच्या बाजारपेठा
मार्चमध्ये सर्वत्र कापणी सुरू होते. साहजिकच मार्च, एप्रिल या महिन्यांत बाजारात आवक अधिक होते. काही शेतकरी साठवणूक करून मे व जूनमध्येही विक्री करतात.जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा व अमळनेर, धुळ्यात शिरपूर व दोंडाईचा (ता.शिंदखेडा) तर नंदुरबारात शहादा व नंदुरबार या बाजार समिती दादर ज्वारीसाठी प्रसिद्ध आहेत. थेट किंवा शिवार खरेदी अपवादानेच होते.
सरासरी आवक (प्रति दिन)
-२०२०- मार्च- एप्रिल- जळगाव व अमळनेर बाजार समितीत मिळून ३००० ते ३२०० क्विंटल.
-२०२१- मार्च- एप्रिल- जळगाव, अमळनेर व चोपडा बाजार समितीत मिळून ४००० ते ४५०० क्विं. -२०२२- ५००० ते ५२०० क्विं.
मार्च ते मे काळातील दर रू. प्रति क्विंटल
मागील चार वर्षांत दर वेगवेगळे राहिले. कोव्हिड काळात ते काहीसे दबावात होते.
२०२०- १३०० ते १८००, सरासरी १५००.
२०२१- १५०० ते १९००, सरासरी १८००
२०२२- १८०० ते २४००, सरासरी २२००
-यंदा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जळगाव, अमळनेर आदी भागात- कमाल ४९०० रु,
किमान ४२०० तर सरासरी ४००० रु.
-दुसऱ्या पंधवड्यात सरासरी ३२०० रु.