शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! कांद्याच्या दरात झाली मोठी वाढ, मुंबई APMC होलसेल बाजारात मिळाला विक्रमीं दर
Mumbai Apmc Onion Rate : राज्यात कांदा या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर सहित पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र या मुख्य नगदी पिकाने गेले सहा ते सात महिने शेतकऱ्यांना चांगलेच रडवले आहे.
या चालू वर्षात फेब्रुवारी महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत चांगल्या दर्जाच्या कांद्याला देखील कवडीमोल दर मिळाला आहे. चांगल्या दर्जाच्या मालाला मात्र पाच ते सहा रुपयांचा दर मिळाला आहे. फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यात तर चांगला कांदा देखील दोन ते तीन रुपये प्रति किलो या भावात विकला गेला होता.
यामुळे शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील वसूल करता आला नाही. खरीप हंगामातील कांदा कवडीमोल दरात विकला गेला मात्र रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र उन्हाळी कांदा बाजारात दाखल झाल्यानंतरही बाजारभावात सुधारणा झाली नाही.
शिवाय उन्हाळी कांद्याला अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा तडाखा बसला असल्याने हा माल चाळीत साठवण्यासारखाही नव्हता. यामुळे जो कांदा अवकाळी आणि गारपिटीत सापडला होता तो कांदा काढणी केल्याबरोबर शेतकऱ्यांनी विकून टाकला. यामुळे उन्हाळी कांद्याची जून महिन्यापर्यंत विक्रमी आवक होत होती.
मुंबई एपीएमसी कांदा बटाटा होलसेल मार्केटमधे   कांद्याच्या दरात विक्रमी वाढ नमूद करण्यात आली आहे. गुरुवारी   १३ जुलै रोजी बाजारात कांद्याला १६०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
बाजारामध्ये १६४०० कांदा पिशवीची आवक झाली. कांद्याला प्रति दहा किलो १६० ते १८० रुपये असा भाव मिळाला आहे. तसेच गोळा कांदा १३० ते १६० रुपये, सुपर कांदा १०० ते १६० रुपये, दोन नंबर गोल्टी कांदा ४० ते ८० रुपये, तीन नंबर बदला कांदा ३० ते ७० रुपये प्रति दहा किलो या बाजारत विकला गेला आहे.
एकंदरीत खरीप हंगामातील लाल कांद्यापाठोपाठ उन्हाळी हंगामातील कांद्याला देखील कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी बांधव अडचणीत सापडले होते. मात्र आता जुलै महिन्यात कांद्याच्या दरात सुधारणा झाली आहे, म्हणून सध्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे झळकू लागले आहेत.