सीताफळाच्या उन्हाळी बहरातील कीड व्यवस्थापन करा नाही तर होणार नुकसान
नवी मुंबई : व्यावसायिक दृष्ट्या चांगले उत्पादन मिळण्यासाठी सीताफळाच्या बहराचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते. सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहर घेतला जातो.मात्र पाण्याची उपलब्धता असल्यास लवकर म्हणजे उन्हाळाच्या सुरुवातीस बहर धरता येतो. उन्हाळी बहाराची फळे जुलै-ऑगस्ट दरम्यान काढणीस तयार होत असल्याने बाजारभाव चांगला मिळतो.
उन्हाळी बहरातील सीताफळास धोका कशाचा?
उन्हाळी बहर धरणाऱ्या काही शेतकऱ्यांनी झाडांची छाटणी पूर्ण केली आहे तर काही शेतकरी छाटणी करण्याच्या तयारीत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सीताफळाची छाटणी केली आहे.
अशा बागांतील नवीन कोवळ्या फुटीवर सध्याच्या वातावरणातील बदलामुळे मावा, फुलकिडे, तुडतुडे यासारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडी पाने, कोवळ्या फांद्या, कळ्या आणि कोवळी फळे यातून रस शोषतात.
त्यामुळे नवीन फुटींची व पानाची वाढ खुंटते. फळांचा आकार वेडावाकडा होतो. फळांची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याच प्रमाणे या किडीद्वारे बाहेर टाकल्या जाणाऱ्या चिकट पदार्थावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे पाने व कोवळ्या फांद्याचे शेंडे तसेच फळे काळपट पडतात. अशा फळांना अपेक्षित बाजारभाव मिळत नाही
कीड व्यवस्थापन
-बागेतील झाडांची छाटणी पूर्ण झाल्यानंतर झाडांवर ताबडतोब बोर्डोमिश्रण (एक टक्का) (१०० ग्रॅम चुना अधिक १०० ग्रॅम मोरचूद प्रति १० लिटर पाणी) या प्रमाणे फवारणी करावी.
- झाडाच्या मुख्य खोडावर जमिनीपासून २ ते २.५ फुटांपर्यंत १० टक्के तीव्रतेची बोर्डोपेस्ट (१ किलो चुना अधिक १ किलो मोरचूद प्रति १० लिटर पाणी) लावावी.