NMMC, MSEB आणि APMC प्रशासनाचा भोंगळ कारभार? | पावसाळी गटारातून विद्युत केबल? | मोठ्या दुर्घटनेची वाट?
गटारातून विद्युत केबल मुंबई APMC निर्यात भवन गेटलागत आहे धक्कादायक प्रकार
उघडी चेंबर, साचलेले पाणी आणि डीपी बॉक्सचा जोड NMMC, MSEB व APMC प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न
एपीएमसी न्यूज नेटवर्क: नवी मुंबईतील तुर्भे सेक्टर 19-F येथील मुंबई APMCच्या निर्यात भवन परिसरातून समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. या व्हिडिओमध्ये उघड्या गटाराच्या चेंबरमधून विद्युत केबल नेण्यात आल्याचे दिसत असून, पुढे त्याच केबलचा डीपी बॉक्समध्ये जोड दिल्याचेही दिसून येत आहे. पावसाळ्यात साचलेले पाणी, उघडी गटारे आणि विद्युत केबल यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबईत उघड्या गटारात पडून एका व्यक्तीचा मृत्यू आणि नेरूळमध्ये विद्युत प्रवाह लागून दोन मुली जखमी झाल्याची घटना अद्याप ताजी असतानाच, नवी मुंबईतील मुंबई APMCच्या निर्यात भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत समोर आलेली ही धोकादायक परिस्थिती नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, मुंबई APMCच्या निर्यात भवनातून टाकण्यात येणारा कचरा मुख्य प्रवेशद्वाराजवळून थेट गटार लाईनमध्ये जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे गटारामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी तुंबत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
निर्यात भवनातील ट्रान्सफॉर्मरमधून बाहेर पडलेली विद्युत केबल उघड्या गटाराच्या चेंबरमधून नेण्यात आल्याचे दिसते. पुढे हीच केबल दुसऱ्या ठिकाणी असलेल्या डीपी बॉक्समध्ये जोडण्यात आल्याचेही दिसून येते. साचलेल्या पाण्याजवळ विद्युत केबलचा जॉइंट असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे,   या निर्यात भवन लागत मशीद, कोल्ड स्टोरेज, ट्रान्सपोर्ट कार्यालये, विविध व्यावसायिक आस्थापने आणि मोठी कार्यालये असून दिवसभर नागरिक, व्यापारी, कामगार आणि वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे येथे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात एक-दोन नव्हे तर अनेक गटार चेंबर उघडी असून, त्याठिकाणी कचरा साचलेला आणि पावसाचे पाणी तुंबलेले आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, हा संपूर्ण परिसर नवी मुंबई महानगरपालिका (NMMC), महावितरण (MSEB) आणि मुंबई APMC प्रशासनाच्या कार्यालयांच्या व कार्यक्षेत्राच्या नजरेसमोर असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. असे असूनही या परिस्थितीकडे संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी NMMC, MSEB आणि APMC प्रशासनाने संयुक्त पाहणी करून उघडी गटारे तातडीने सुरक्षित करावीत, गटारात जाणारा कचरा रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, विद्युत केबलची सुरक्षित पुनर्बांधणी करावी आणि संपूर्ण परिसराची स्वच्छता करून जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
उपस्थित होणारे प्रश्न
* उघड्या गटाराच्या चेंबरमधून विद्युत केबल का नेण्यात आली?
* निर्यात भवनातील कचरा थेट गटारात कसा जात आहे?
* परिसरात पसरलेल्या घाणीसाठी जबाबदार कोण?
* इतक्या वर्दळीच्या परिसरात उघडी गटारे आणि विद्युत केबल कितपत सुरक्षित?
* NMMC, MSEB आणि APMC प्रशासनाच्या समोर हा प्रकार घडत असताना कारवाई का होत नाही?
* एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित यंत्रणा जागी होणार का?
दरम्यान, या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या परिस्थितीची संबंधित विभागांनी तातडीने संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.