Mumbai Rains : मुंबईतील पावसासंदर्भात आयएमडीचे मोठे अपडेट, कधीपासून मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम यंदा मान्सूनवर झाला. यामुळे राज्यात मान्सून अजून सक्रीय झाला नाही. महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल थांबली आहे. राज्यात मान्सून ११ जून रोजी कोकणात दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. आता कोकणातून मान्सूनची वाटचाल सुरु होणार आहे. लवकरच कोकणातून मुंबईत मान्सूनचे आगमन होणार आहे. यासंदर्भात मुंबई हवामान विभागाकडून माहिती देण्यात आलीय.
कधी येणार मुंबईत मुसळधार
आता अरबी समुद्रात कमी दाबाचा निर्माण झाला आहे. यामुळे मान्सून आणखी सक्रिय होणार आहे. पुढील 72 तासांमध्ये मान्सून मुंबई, पुणे शहरात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे रत्नागिरीमध्ये थांबलेला मान्सूनचा प्रवास आता पुढे ७२ तासांमध्ये होणार आहे. मुंबईत त्याचे आगमन होऊ शकते, असे हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले. येत्या 72 तासांत मान्सून मुंबई, पुणे, महाराष्ट्राचा दक्षिण मध्य भाग, कोकण, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचा इतर भाग व्यापण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. राज्यात 21 ते 23 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
कोकणानंतर मुंबईत येतो पाऊस
दरवर्षी केरळमध्ये १ जून रोजी मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर कोकणात ८ जूनपर्यंत पाऊस दाखल होतो. कोकणातून मुंबईसह महाराष्ट्रात दोन, तीन दिवसांत मान्सून पोहचतो. परंतु यंदा मान्सून कोकणात आला तरी बिपरजॉय चक्रीवादळामुळे त्याचा प्रवास थांबला आहे. कोकणात ११ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर १५ जूनपर्यंत मान्सून राज्यभर पोहचणार होता. परंतु मान्सून अजूनही थांबल्यामुळे शेतकरी वर्गांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. परंतु आता मान्सून मुंबईनंतर दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांचाही आशा पल्लवित होणार आहे.
राज्यात पेरण्या खोळंबल्या
यंदा जूनचा तिसरा आठवडा संपत आला तरी पाऊस न पडल्याने खरिपाच्या सोयाबीन, तूर, मूग यासह विविध पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस नसल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कपाशीला पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे उन्हाळी कपसाचे पीक वाळत आहे. त्यातच जर येत्या 4 ते 5 दिवस पाऊस पडला नाही तर लागवड झालेली कपाशी वाळून जाण्याची शक्यता आहे. मान्सून संपूर्ण सक्रीय झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, जमिनीतील ओल पाहूनच पेरणी करावी, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.