कांद्यामुळे वांदा झालेल्या शेतकऱ्यांसाठी ‘खुशखबर ’; लाल कांद्याचे नवं ‘वाण’ विकसित
गेल्या काही वर्षांपासून कांद्याची स्थिती काही फारशी चांगली नाहीये. उत्पादन खर्चही निघत नाही अशी स्थिति काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यात जर लाल कांदा असेल तर तो लागलीच विकावा लागतो. त्याची साठवण क्षमताही काही जास्त दिवस नसते. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटकुटीला आला होता. एकूणच काय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा अक्षरशः वांदा झालेला असतांना एक आनंदाची आणि दिलासादायक बाब समोर आली आहे. उन्हाळ कांद्याच्या प्रमाणे टिकवण क्षमता आणि दिसायला लाल कांद्यासारखं नवं कांद्याचे वाण बाजारात दाखल होणार आहे.
लाल रंग असलेल्या कांद्याला बाजारात चांगली मागणी असते. त्या धरतीवर राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राकडून उन्हाळ कांद्याप्रमाणेच टिकवण क्षमता असलेले लाल कांद्यामध्ये नवीन वाण विकसित करण्यात आले आहे.
हेक्टरी 380 ते 400 क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे हे वाण आहे. एन एच आर डी एफ फुरसुंगी असे या लाल कांद्याच्या वाणाला नाव देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी लवकरच हे बियाणे उपलब्ध केले जाणार आहे.हे वाण 110 ते 120 दिवसात काढणीला येते. उन्हाळ कांद्याप्रमाणे पाच ते सात महिने टिकवण क्षमता असलेले हे नवीन वाण आहे. वजन देखील चांगले असल्याने हेक्टरी 380 ते 400 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.लाल कलर असल्याने बाजार मागणी देणार असल्याने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्राचे प्लांट पॅथॉलॉजी टेक्निकल अधिकारी मनोज पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान या वाणाच्या किंमतीबद्दल स्पष्टता विक्रीच्या वेळेसच होणार आहे.