Banana Export : आखाती देशात 600 टन केळीची निर्यात
 
नांदेड : जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या अर्धापूर तालुक्यातील केळीची निर्यात आखाती देशात होत आहे. बारड येथील शीतलादेवी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून गेल्या ३० दिवसांत इराण, इराक, अफगाणिस्तान, ओमान, दुबईसह इतर देशांत ६०० टन केळीची निर्यात केली आहे. सध्या देशासह विदेशात केळीला मागणी वाढल्याने १४०० ते १५०० रुपये क्विंटल दर मिळत असल्याचे कंपनीचे संचालक नीलेश देशमुख यांनी सांगितले.
कोरोना लॉकडाउननंतर सध्या केळीची निर्यात होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अन्यथा अनेकवेळा अत्यल्प दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे अवघड होऊन बसते. परंतु सध्या संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातून देशातील प्रमुख शहरात व इराणसह अनेक देशांत केळीच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. आठशे ते हजार रुपये प्रति क्विंटलवर असलेला दर आता १४०० ते १५०० पर्यंत गेल्यामुळे शेतकऱ्यांमधूनही समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील अर्धापूर परिसरात पिकणारी केळी ही खाण्यासाठी चविष्ट व टिकाऊ असल्यामुळे मोठी मागणी असते.
चांगले पर्जन्यमान आणि इसापूर-येलदरी धरणांत पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे केळीची लागवड झाली होती. नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाना या राज्यांत केळी पाठविणे सुरू आहे. दर्जेदार केळीची निवड करून बांधावरच मागणीप्रमाणे पॅकिंग करून गाडी भरण्यात येत आहे. तसेच जहाजांच्या माध्यमातून इराणसह विविध देशांत निर्यात होत आहे.
गेल्या ३० दिवसांत इराण, इराक, अफगाणिस्तान, ओमान, दुबईसह इतर देशांत ६०० टन केळी निर्यात केली आहे. केळींची मागणी वाढल्यास दरातही चांगली सुधारणा होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. गत काही दिवसांत मागणी वाढल्याने केळीच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे.