ED New Rule: 30 लाखांवरील रकमेचा गुन्हा ईडीच्या कक्षेत संचालनालय स्वत:हून करणार कारवाई
 
मुंबई: 2014 पासून सक्तवसुली संचालनायलाकडून (ED) होत असलेल्या कारवायांबाबत आपण सर्वच ज्ञात आहोत. अगदी गावपातळीवरही ईडी माहीत झाली आहे. आतापर्यंत ईडीकडून झालेल्या कारवायांमध्ये करोडो रुपये जप्त करण्यात आले आहेत. ईडी कोणत्या प्रकरणांत कारवाई करते, याबाबत काही निकष असतात. परंतु आता ईडीकडून कारवाई करण्याबाबत काही नवीन नियम बनवण्यात आल्याचे समजते आहे. (ED New Rule Crime above 30 lakhs under ED Directorate will take action on its own)
लाचलुचपत प्रतिबंधक आणि आर्थिक गुन्हे शाखेकडे 30 लाखांपेक्षा अधिक रकमेचे दाखल झालेले गुन्हे ईडी आपल्या कक्षेत घेणार आहे आणि स्वत:हून चौकशी सुरू करून कारवाई करणार असल्याचं समोर आलं आहे. तशी काही उदाहरणंही मुंबईत झालेल्या कारवायांबाबत सांगता येतील.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत ईडी स्वत:हून कारवाई करत नव्हती. परंतु अलीकडे काही प्रकरणात रोख रकमेचा व्यवहार मोठ्या प्रमाणात झाल्याची बाब समोर आल्यानंतर ईडीने स्वत: हून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.
ईडीच्या कारवाईची काही उदाहरणं
ललित टेकचंदानी प्रकरण
अलीकडेच ईडीने टेकचंदानी यांच्यावर कारवाई केली. विकासक ललित टेकचंदानी यांच्याविरुद्ध मुंबई व नवी मुंबई पोलीस ठाण्यात घर खरेदीदारांना फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात ईडीने चौकशी केली तेव्हा बेहिशोबी नोंदी सापडल्या. त्यानंतर धाडी टाकून 30 कोटींची मालमत्ता तसंच, अनेक आक्षेपार्ह कागदपत्रेही ईडीने जप्त केली.
निर्मल लाइफस्टाईल
निर्मल लाइफस्टाईलचे धर्मेश जैन आणि राजीव जैन यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा दाखल करून नंतर तो तपास बंद केला, तरी या काळात ईडीने छापे टाकून ऐवज जप्त केला होता.
‘भारतक्षेत्र’ प्रसिद्ध साडीचं दुकान
दादरमधील प्रसिद्ध साडी व्यावसायिक भारतक्षेत्र या दुकानावर कारवाई करताना ईडीने भोईवाडा पोलीस ठाण्यात 2019 मध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने कारवाई केली.त्यामुळे आता अशा पद्धतीने ईडीने आपलं काम सुरू केलं असल्याची माहिती समोर येत आहे.
कायदा काय सांगतो?
भारतीय दंड संहितेनुसार, गुन्हा दाखल झाल्यास त्यात रोखीचा संशयास्पद व्यवहार जर का 30 लाखांपेक्षा अधिक असेल तर त्या प्रकरणाची माहिती संबंधित यंत्रणेनं ईडीला देणं आवश्यक आहे. त्यानंतर ईडी त्यावर योग्य ती चौकशी करून, काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करते. एखाद्या प्रकरणाच्या चौकशीत जर काळा पैसा आढळला तरचं ईडी कारवाई करत असल्याचंही समोर आलं आहे.