शेतकऱ्यांना पावसाची आस ... कधी दाखल होणार मान्सून
 
बिपरजाॅय चक्रीवादळाची तीव्रता आणखी कमी झाली. चक्रीवादळाचे रुपांतर आता कमी दाब क्षेत्रात झाले आहे. त्यामुळे गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ तसेच दक्षिण राजस्थानसह काही भागांमध्ये पाऊस पडत आहे. या भागाातील जनजीवन अद्यापही विस्कळीत आहे. तर माॅन्सूनची वाटचाल आजही थबकलेलीच होती.
चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर माॅन्सूनची वाटचाल थांबलेली आहे. माॅन्सून मंगळवारपासून एकाच भागात ठाण मांडूण आहे. माॅन्सून सध्या कोकण, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये आहे. माॅन्सूनने आजही प्रगती केली नाही.
आजही माॅन्सूनची सिमा रत्नागिरी, कोप्पाल, पुट्टापारथी, श्रीहरीकोटा, मालदा आणि फोरबेसगंज या भागात होती. पण १९ ते २२ जूनच्या दरम्यान माॅन्सून दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग, पूर्व भारत आणि शेजारच्या भागात प्रगती करु शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
दुसरीकडे बिपरजाॅय चक्रीवादळाची तीव्रता सौराष्ट्र आणि कच्छ भागात कमी झाली आहे. आग्नेय पाकिस्तान आणि शेजारच्या आग्नेय राजस्थान आणि कच्छ भागात या चक्रीवादळाचे रुपांतर हवेच्या कमी दाब क्षेत्रात झाले आहे. हे चक्रीवादळ आता ईशान्येकडे १० किलोमीटर प्रतितास वेगाने वाटचाल करत आहे.
सध्या हे चक्रीवादळ नैऋत्य राजस्थानमध्ये गुजरात आणि आग्नेय पाकिस्तानच्या जवळ आहे. चक्रीवादळ राजस्थानमधील बारमेरपासून ८० किलोमीटर आणि जोधपूरपासून २१० किलोमीटर अंतरावर आहे. हे चक्रीवादळ पूर्व ईशान्य भागाकडे सरकण्याची शक्यता आहे.
तर वादळाची तीव्रता पुढील ६ तासांमध्ये आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील १२ तास हे दाब क्षेत्र कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
चक्रीवादळामुळे या भागात पुढील १२ तास ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. १२ तासानंतर वाऱ्यांचा वेग कमी होऊन ३५ ते ४५ किलोमीटर प्रतितास होईल. दक्षिण राजस्थान आणि गुजरातमधील कच्छ भागात पावसाचा अंदाज आहे. दक्षिण राजस्थानमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे.
तर कच्छ भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. यासोबतच पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालॅंड, मनिपूर, त्रिपुरा, सौराष्ट्र आणि कच्छ, कोकण आणि गावा या भागात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे.