दराअभावी पन्नास टक्के कापूस शेतकऱ्यांकडे पडून सरकारी खरेदीही नाही दर आला साडेसहा हजारांवर
एपीएमसी न्युज डेस्क: यंदा कापसाची लागवड कमी आहे. त्यामळे चांगला दर मिळेल असा अंदाज बाधून कापसाचे उत्पादन घेतले खरे, मात्र दर वाढण्याऐवजी सुरुवातीला मिळणाऱ्या दरात वरचेवर घसरण होत असल्याचे दिसत आहे. सध्या मिळणारा दर परवडणारा नसल्याने दरवाढीच्या आशेने कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. सध्या कापसाला केवळ साडे सहा हजारांपर्यंत प्रती क्विंटलला दर मिळत आहे. कापसाची सरकारी खरेदीची मात्र शेतकऱ्यांना कल्पनाही नाही. दर मिळत नसल्याने दरवाढीची प्रतीक्षा करत ५० टक्के कापूस घरातच पडून आहे.
राज्यात यंदा ४२ लाख ४० हजार हेक्टरवर यंदा कापसाची लागवड झाली होती. नाशिक, नगर, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, धुळे, नंदुरबार,जालना, जळगाव, बीड, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत कापसाचे क्षेत्र अधिक होते. साधारण डिसेंबर जानेवारीतच कापसाची बहुतांश शेतकरी कापसाची विक्री करतात. गेल्यावर्षी कापसाचे दर पाच हजारांवरून १२ हजारांपर्यंत गेल्याने यावर्षी कापसाचे दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी त्याला बाजारपेठ दाखवली नाही. नोव्हेंबरमध्ये सहा हजार रुपये क्विंटल या दराप्रमाणे सुरू झालेली कापूस खरेदी डिसेंबरमध्ये सहा आठशे, जानेवारीत सहा सातशे झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला. दर मिळत नसल्याने कापसाची विक्री करता येत नसल्याने अजूनही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे
गतवर्षीपेक्षाही परिस्थिती अवघड
राज्यात मराठवाडा, विदर्भ, नगर, सोलापूर भागांत कापसाचे क्षेत्र अधिक असते. गेल्यावर्षी कापसाला सुरुवातीच्या काळात अकरा हजारांपर्यंत दर मिळाला. मात्र कापसाचे दर यापेक्षाही वाढणार असल्याची शक्यता सांगितली जात असल्याने शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला. मात्र दर वाढण्याऐवजी कमी होत गेले. अनेक शेतकऱ्यांना सात ते साडेसात हजार रुपये क्विंटलने कापूस विकावा लागला. काही शेतकऱ्यांचा कापूस अगदी जून-जुलैपर्यत घरात पडून होता. यंदा तर त्यापेक्षा गंभीर स्थिती झाली आहे. सध्या कापसाला गतवर्षीपेक्षा एक ते दीड हजार रुपये प्रती क्विंटलला कमी मिळत आहेत अशी प्रतिक्रिया लक्ष्मण तांबे यांनी दिली .