Govt Job: या अभ्यासक्रम मधे उत्तीर्ण व्हाल तरच प्रमोशन आणि पगारवाढ होणार, मोदींच्या अटीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची गोची

-आता मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निकष बदलणार 
-कसा असेल अभ्यासक्रम? 
मुंबई ,एपीएमसी न्यूज नेटवर्क:
सरकारी कर्मचाऱ्यांचा कायमच प्रत्येकाला हेवा वाटतो. या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपापासून ते अगदी त्यांना मिळणारा पगार आणि भत्ते, यासंदर्भातही कायमच चर्चा होत असतात. यांमध्ये अग्रस्थानी असतो तो म्हणते सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणारा आणि ठराविक कालावधीनंतर बदलणारा (Pay Commission) वेतन आयोग. जिथं श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या वेतनाची आकडेवारीसुद्धा बदलते किंबहुना वाढते. इथं खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणं Appraisal साठी होणारी वणवण तुलनेनं कमीच.  आता मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निकष बदलणार 
दरम्यान, केंद्र शासनाच्या किंबहुना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशांनंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भात एक नवा नियम लागू होत आहे. उपलब्ध माहितीनुसार कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणं आवश्यक असेल. सरकारी कर्मचाऱ्यांनी आयजीओटी कर्मयोगी पोर्टलद्वारे वार्षिक ऑनलाइन डिजिटल कोर्स पूर्ण करावेत असे निर्देश या धर्तीवर जारी करण्यात आले आहेत. 
उत्तीर्ण व्हाल तरच पगारवाढ....
पंतप्रधानांच्या अखत्यारीत येणाऱ्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या वतीनं सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना हा कोर्स उत्तीर्ण होणं अनिवार्य असल्याचं सांगत त्यांच्या वार्षिक कामगिरी मूल्यांकन अहवालांवर या निकालाचा (एपीएआर) परिणाम होईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 
सदर कोर्ससाठी पूर्ण नियोजन करण्यात आलं असून, 31 जुलैपर्यंत अभिमुखता कार्यशाळा पूर्ण करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असून, 1 ऑगस्टपर्यंत अभ्यासक्रम योजना अपलोड करून 15 नोव्हेंबरपर्यंत मूल्यांकन करण्यात येण्याचं इथं सांगण्यात आलं आहे. 
कसा असेल अभ्यासक्रम? 
प्रत्येक मंत्रालय, विभाग, संघटना आणि संबंधित नियंत्रण प्राधिकरण विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी किमान सहा अभ्यासक्रम निश्चित करतील. जिथं, नऊ वर्षे, 16 वर्षे आणि त्याहून जास्त वर्षे. 25 आणि त्याहून अधिक वर्षाची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कर्मचारी सेवेनुसार अभ्यासक्रम निर्धारित केला जाईल. ज्यापैकी किमान 50 टक्के अभ्यासक्रम कर्मचाऱ्यांनी पूर्ण करणं अपेक्षित असेल. ज्याची आकडेवारी वार्षिक मूल्यांकन अहवालामध्ये जोडली जाईल. हे मूल्यांकन त्यांच्या अधिकृत कामगिरीच्या नोंदींचा एक भाग असेल.
थोडक्यात सर्व कर्मचाऱ्यांना पदोन्नती आणि सेवा नोंदींसाठी हे कोर्स उत्तीर्ण करावे लागतील. ज्याचा थेट परिणाम मूल्यांकन अहवाल आणि प्रमोशनवर होणार असून, अभ्यासक्रमाची माहिती 'स्पॅरो' या ऑनलाइन मूल्यांकन प्रणालीशी जोडली जाईल. कर्मचारी जोपर्यंत कोर्स पूर्ण करत नाहीत तोपर्यंत मूल्यांकन अपूर्ण राहील आणि याचा थेट परिणाम कर्मचाऱ्याच्या प्रगतीसह बढती आणि सेवेवर होणार आहे.