Grape Export : युरोपियन बाजारपेठेत भारतीय द्राक्षांना वाढती मागणी ; निर्यातीत १० टक्क्यांची वाढ
 
नाशिक : युरोपियन बाजारपेठेत भारतीय द्राक्षांच्या मागणीत चांगलीच तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी २०२३-२४ च्या हंगामात ताज्या द्राक्षांच्या निर्यातीत १० टक्क्यांची वाढ झाल्याचे चित्र आहे.
मार्च महिन्यात द्राक्ष निर्यात हंगाम शिखरावर राहणार असल्याने निर्यातीतील वाढ दुप्पट राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीत आतापर्यंत २० टक्क्यांची वाढ झाली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
भारतीय द्राक्षांना युरोपियन बाजारपेठेत चांगली मागणी आहे. युरोपियन बाजारपेठेतून ताज्या द्राक्षांना मजबूत मागणी पाहता २०२३-२४ हंगामात भारतीय द्राक्षांच्या निर्यातीत १० टक्क्यांहून अधिक वाढ दिसून येत आहे.
लाल समुद्रातील हूती बंडखोरांच्या धोक्यामुळे निर्यात खर्च जवळजवळ दुपटीने वाढला आहे. दक्षिण आफ्रिकेतून द्राक्ष पुरवठ्यात व्यत्यय आल्याने युरोपमध्ये भारतीय द्राक्षांच्या मागणीत वाढ झाल्याचे द्राक्ष निर्यातदार सांगतात.
निर्यात हंगाम ३ आठवडे आधीच सुरू
देशातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी बिझनेसलाईनशी बोलताना सांगितले की, गेल्या वर्षीच्या याच कालावधित झालेल्या द्राक्ष निर्यातीच्या तुलनेत यंदा निर्यातीत २० टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत द्राक्ष तोडणी लवकर झाल्यामुळे यंदा निर्यात हंगाम तीन आठवडे आधीच सुरू झाला. निर्यातीतील अडथळ्यांमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढत आहे. परंतु युरोप ही आमच्या द्राक्षांची सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि तिथून मागणी जास्त असल्याने दरही चांगले आहेत.
दुप्पट द्राक्ष निर्यातीची अपेक्षा
भारतीय द्राक्षांचा निर्यातीचा हंगाम प्रामुख्याने जानेवारी ते मार्च या कालावधित असतो. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या सुरूवातीला अवकाळी पावसाच्या सरी पडल्या असल्या तरी, या हंगामात द्राक्ष उत्पादन चांगले झाले असून दर्जाही चांगला राहिला आहे.
लाल समुद्रातील वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे द्राक्ष निर्यातीत दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. २०२२-२३ च्या हंगामात भारताने २.६७ लाख टन द्राक्ष निर्यात केली होती. मार्चमध्ये महिन्यात निर्यात शिखरावर असते. त्यामुळे यावर्षी निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट होण्याची शक्यता आहे.
नेदरलँड सर्वात मोठा खरेदीदार
दरम्यान, युरोपियन बाजरपेठेतील नेदरलँड हा भारतीय द्राक्षांचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. एकूण द्राक्ष निर्यातीच्या ४० टक्के खरेदी एकट्या नेदरलँडकडून केली जाते. याशिवाय युएई, युके, रशिया आणि बांगलादेश हे भारतीय द्राक्षांचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. दक्षिण आफ्रिकेतूनही या देशांना द्राक्षांचा पुरवठा केला जातो. मात्र, सध्याच्या व्यापार मार्गातील अडथळ्यांमुळे या बाजारपेठेत भारतीय द्राक्षांची मागणी झापाट्याने वाढत आहे.