Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीने ३० लाख मजुरांवर बेकारीची कुऱ्हाड
 
-७ हजार कंटेनर मुंबईतील न्हावाशिवासह इतर पोर्ट पार्किंगवर धूळ खात पडून आहेत.
-कांदा निर्यातबंदी झाल्यामुळे लाखो मजूर सध्या बेरोजगार आहेत.
एपीएमसी न्यूज डेस्क : कांदा निर्यातबंदीचा फटका शेतकऱ्यांना तर बसलाच आहे परंतु, या व्यवसायावर अवलंबून असलेले मजूर, शिपिंग एजंट त्यावर आधारित कामगार, ट्रकचालक, क्लिनर, सुरक्षारक्षक, संगणक ऑपरेटर अशा विविध ३० लाख जणांवर बेकारीची कुन्हाड कोसळली आहे. कांदा वाहतूक करणारे सात हजार कंटेनर मुंबईतील न्हावाशिवासह इतर पोर्ट पार्किंगवर प्रतीक्षेत आहेत. त्यांना कंटेनर उभे राहण्यासाठीचे सतराशे रुपये महिना भाडे नाहक अदा करावे लागत आहे. तसेच कंटेनरवरील १४ हजार चालक आणि क्लिनरवरही उपासमारीची वेळ आली आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचेकडे कामगार, ट्रान्सपोर्ट, शिपिंग अशा विविध संघटनांनी या संदर्भात नुकताच पत्रव्यवहार केला असून प्राप्त माहितीनुसार केंद्रीय समिती या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जानेवारीत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. महाराष्ट्रातील उन्हाळी आणि लाल कांद्याला थेट कर्नाटक, गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांद्याबरोबर दराची स्पर्धा करावी लागत आहे.
देशभरात महाराष्ट्रापेक्षा या चार राज्यांकडून स्वस्तात कांदा मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातून तीन लाख टन कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या सर्व परिस्थितीने कांदा उत्पादक अडचणीत असताना आता कांद्यावर आधारित कामगार व मजुरांना देखील त्याचे चटके बसत आहे. ट्रान्सपोर्ट युनियनचे भारत शिंदे यांनी हा व्यवसायच गुंडाळला जाण्याची शक्यता वर्तविली.
बॅग कारखान्यातून २० कोटींचा टर्नओव्हर ठप्प
कांदा पॅकिंगसाठी जाळीच्या विविध आकारातील लाल बेंग बनविल्या जातात. आता फक्त देशांतर्गत कांदा वाहतूक होत असल्याने या बॅग बनविणाऱ्या कंपन्यांमधील जवळपास दीड लाख कामगार, कर्मचारीही बेकार झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात बॅग बनविणाऱ्या लहान मोठ्या अशा पन्नास कारखान्यातील परिस्थिती विदारक आहे. बॅग बनविण्यासाठीचे काम फक्त दहा टक्के सुरू असल्याने जिल्ह्यात या व्यवसायातून महिन्याकाठीचा २० कोटीचा टर्नओव्हर थांबला आहे. इतकेच काय तर नाशिक, सोलापूर, अहमदनगर, धुळे येथील कांदा पॅकिंग करणारे १० लाखाहून अधिक घटकही नुसते बसून आहेत.
१,५०० कंटेनरचा रोजचा प्रवास थांबला
सामान्यतः दिवसात कांदा वाहतूक करणारे एक हजार ट्रक देशांतर्गत विक्रीसाठी जातात आणि पाचशे कंटेनर रोज निर्यातीसाठी जातात पण निर्यातच बंद असल्याने या १,५०० कंटेनरचा रोजचा प्रवास थांबला आहे, तर ट्रान्सपोर्ट व्यवसायावर आधारित कामगार, कर्मचारी, चालक, क्लिनर, मेकॅनिकल असे चार ते पाच लाख घटकही प्रभावित झाले आहेत.
शिपिंग व्यवसायालाही कळा
कांदा निर्यात बंदीचा मोठा फटका शिपिंग व्यवसाय व अधिकृत ब्रोकर लाइनलाही बसला. या क्षेत्रातील चार लाख लोकांवर बेकारीची कुहाड कोसळली आहे. नाशिक व मुंबईतील अंदाजे साडेपाच हजार एजंट व त्यांच्यावर आधारित शिपिंग कामगार, कर्मचारी, सुरक्षारक्षक, संगणक ऑपरेटर, मजूर, खासगी कृषी पर्यवेक्षक असे विविध चार लाख घटकही आता दुसरे काम शोधत आहेत.