सातारा लोकसभा : साताऱ्याच्या जागेवरुन भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू; तर दुसरीकडे शरद पवारांची मोर्चेबांधणी
 
नवी मुंबई : येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्याचा निर्णय आज नवी मुंबई येथील माथाडी भवन कार्यालयात युनियनचे पदाधिकारी व विविध माथाडी बोर्डाच्या टोळ्यांचे मुकादम व कार्यकर्त्यांनी केली आहे.तर दुसरीकडे सातारा मतदारसंघ भाजपला मिळाल्यास खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हेच उमेदवार असणार आहेत. असे राजे यांच्या   कार्यकर्तेही ठामपणे दावा करत आहेत. पण, भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या यादीत साताऱ्याचा उमेदवार जाहीर केलाच नाही. त्यामुळे साताऱ्याच्या जागेवरुन भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या माथाडी भवन, नवीमुंबई येथिल कार्यालयात विविध माथाडी बोर्डाच्या टोळ्यांचे मुकादम, उपमुकादम व युनियनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक झाली, या बैठकिमध्ये ही मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकिस युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, अध्यक्ष एकनाथ जाधव, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख उपस्थित होते.
माथाडी टोळ्यांचे कार्यकर्ते सर्वश्री सुरज बर्गे, दिनकर सनुगले, जितेंद्र येवले, संभाजी बर्गे, अजय इंगुळकर, पोपटराव पवार-केवलकर, पांडुरंग धोंडे, संतोष कोंढाळकर, नाना धोंडे आदींनी नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळण्याची मागणी करण्याबाबतचे आपले विचार मांडले. संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील व जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी उमेदवारी मिळण्याबद्दलची सविस्तर माहिती कार्यकर्त्यांना दिली.
माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना सन 2019 मध्ये शिवसेना-भाजप युतीने सातारा लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती, त्यावेळी नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली होती, त्यावेळी माथाडी कामगार कार्यकर्त्यांनी सातारा लोकसभा मतदार संघामध्ये अवघ्या 20 ते 25 दिवसांमध्ये प्रचार यंत्रणा राबवून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने विजयापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी अधिक चांगले नियोजन करुन नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना विजयी करण्याचा विश्वास कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत महायुतीत तिढा वाढत चालला आहे. शिवसेनेचा मतदारसंघ असलातरी सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावे केले जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ५ महिन्यापूर्वी मुंबई सिल्वर ओक मध्ये एका बैठक आयोजित केले होते त्यामध्ये सातारा मधून खासदार साठी शशिकांत शिंदे यांच्या नाव सुचवले होते त्यावेळी सातारा मध्ये शिंदे समर्थकाने फटाके बाजवून जल्लोष साजरा केला होता , तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वीच सातारा लढविण्याचे जाहीर केले. तर तीन दिवसांपूर्वी कऱ्हाडला २०१९ ला जिंकेलेल्या जागांवर त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहणार असल्याबाबत युतीत प्राथमिक चर्चा झाल्याची माहितीही दिली होती. त्यामुळे एक जागेसाठी भाजपचे छत्रपती उदयनराजे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटीलमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे, तर दुसरीकडं   शरद पवार गटाने आपल्या बालेकिल्ला टिकवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
साताऱ्यातून पवार गेम पलटवणार?
या सगळ्या राजकीय गणितापलीकडे आणखी एक फॅक्टर महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे शरद पवार. सातारा हा शरद पवारांचा बालेकिल्ला. या जिल्ह्यात पवारांचा जनसंपर्कही तेवढाच दांडगा. सातारा जिल्ह्याने शरद पवारांना भरपूर दिले आणि पवारांनी या जिल्ह्यावर विशेष असं प्रेम केलंय. गेल्या वेळच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यातून संपली अशी चर्चा सुरू असताना पवारांनी राज्यातील सत्तेचा गेम पलटवला तो याच साताऱ्यातून. आपल्या मित्रासाठी त्यांनी धो धो पावसात भिजून भाषण केलं, आणि राज्यभरात राष्ट्रवादीसोबत काँग्रेसचेही अनेक आमदार निवडून आणले.   त्यामुळेच शरद पवार पुन्हा एकदा आपल्या पक्षाचे उमेदवाराला निवडून आणण्यासाठी   ढाल बनून भाजपचा वार परतवणार का हे पहावं लागेल.
सातारा लोकसभा मतदारसंघाची रचना (Satara Lok Sabha Constituency Detail) 
सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये भाजपचा एक आमदार, शिवसेना शिंदे गटाचे दोन, काँग्रेसचा एक, अजित पवार आणि शरद पवार गटाचा प्रत्येकी एक असे आमदार आहेत.
सातारा जावळी - शिवेंद्रराजे, भाजप
कोरेगाव - महेश शिंदे, शिवसेना शिंदे गट
कराड उत्तर - बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी शरद पवार
कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
पाटण -शंभुराज देसाई,   शिवसेना शिंदे गट
वाई - मकरंद पाटील, राष्ट्रवादी अजित पवार
2019 सालचा निकाल (Satara Lok Sabha Constituency 2019 Result)
उदयनराजे (राष्ट्रवादी) - 5, 79,026   विजयी 
नरेंद्र पाटील (शिवसेना) - 4,22,498
2019 पोटनिवडणूक निकाल (Satara Lok Sabha Constituency 2019 Result)
2009, 2014 आणि 2019 साली राष्ट्रवादीतून तीन वेळा खासदार झालेल्या उदयनराजेंनी तिसऱ्यांदा निवडून येताच चारच महिन्यात राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांना पराभूत केलं.
श्रीनिवास पाटील (राष्ट्रवादी) 6,36,626   (51.04 टक्के)
उदयनराजे (भाजप) - 5,48,903   (44.01 टक्के)
विजयी - श्रीनिवास पाटील, 87,000 मतांनी विजय.
सातारा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला (Satara Lok Sabha Constituency Detail)
1952 -काँग्रेसचे गणेश आळतेकर हे तेव्हाच्या कराड लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार होते.
1967 ते 1980 या दरम्यान चार वेळा यशवंतराव चव्हाण हे खासदार होते. 
सन 1999 पासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.