सोयापेंडची निर्यात घटली; फ्रान्स, जर्मनी ठरले भारताच्या सोयापेंडचे मोठे ग्राहक

पुणे : देशात यंदा सोयापेंडची निर्यात कमी झाली आहे. चालू हंगामात ऑक्टोबर ते जानेवारी या काळात सोयापेंड निर्यात दीड लाख टनाने कमी होऊन ८ लाख टनांवरच स्थिरावली आहे. त्यातही फ्रान्स, जर्मनी, नेदरलॅंड आणि नेपाळला चांगली निर्यात झाली आहे. तसेच देशात यंदा सोयाबीनचे गाळप कमी होऊन सोयापेंड निर्मतीही कमी झाली, असे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.
सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने आपला अहवाल नुकताच प्रसिध्द केला. या अहवालात देशातील सोयाबीनची जानेवारीपर्यंतची बाजारातील आवक, गाळप, आयात-निर्यात, सोयापेंड निर्मिती, सोयापेंडचा वापर आणि निर्यात याची माहीती दिली. चालू हंगामात सुरुवातीपासूनच चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडला कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी भाववाढीच्या आशेने थांबले आहेत. त्यातही आता सरकारची खरेदी बंद झाली. याचा परिणाम दरावर दिसत असला तरी काही दिवसांपासून बाजारातील आवक वाढलेली आहे.
देशात जानेवारीच्या शेवटपर्यंत ४२ लाख ५० हजार टन सोयाबीनचे गाळप झाले. त्यातून ३३ लाख ५४ हजार टन सोयापेंची निर्मिती झाली. मागील वर्षी याच काळात ४७ लाख टनांचे गाळप होऊन त्यातून ३७ लाख टन सोयापेंड निर्मिती झाली होती. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत जवळपास साडेचार लाख टनांनी सोयापेंड निर्मिती कमी झाली. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांतील तुलना केल्यास यंदा या तीनही महिन्यात कमी सोयाबीन गाळप आणि कमी सोयापेंड निर्मिती झाली. तर केवळ जानेवारी महिन्यात गाळप काहीसे यंदा अधिक होऊन सोयापेंड निर्मितीही अधिक झाली.
सोयापेंड निर्मितीचा विचार करता, यंदाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये निर्यात जवळपास दीड लाख टनांनी कमी झाली. गेल्या हंगामात ऑक्टोबर ते जानेवारी या चार महिन्यांमध्ये ९ लाख ३४ हजार टन निर्यात झाली होती. यंदा मात्र निर्यात ७ लाख ९६ हजार टनांवरच स्थिरावली. सोयापेंड निर्यात पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कमीच राहीली. मात्र जानेवारी महिन्यात निर्यात नगण्य प्रमाणात वाढली होती. जानेवारी २०२५ मध्ये २ लाख ७८ हजार टन निर्यात झाली. तर जानेवारी २०२४ मधील निर्यात २ लाख ७५ हजार टन झाली होती.
फ्रान्स, जर्मनीचा आधार
देशातून यंदाच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये फ्रान्स आणि नेदरलॅंडला चांगली निर्यात झाली आहे. तर शेजारच्या बांगलादेश, नेपाळ आणि इतर देशांना होणारी निर्यात काहीशी माघारली आहे. चार महिन्यात भारतातून सर्वाधिक १ लाख २७ हजार टन निर्यात फ्रान्सला झाली. तर जर्मनीला १ लाख ३ हजार टन झाली. नेपाळला ९० हजार टन, नेदरलॅंडला ८५ हजार टन आणि बांगलादेशला ७६ हजार टन सोयापेंडची ऑक्टोबर ते जानेवारीच्या दरम्यान निर्यात झाली.