माथाडी कामगारांच्या जीवनात सोनेरी दिवस आणणारे माथाडींचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांची 90 व्या जयंती थाटामाटात साजरी होणार-नरेंद्र पाटील

 
*माथाडी कामगारांच्या जीवनात सोनेरी दिवस आणणारे माथाडींचे आराध्यदैवत स्व.आमदार अण्णासाहेब पाटील  यांची 90 व्या जयंती थाटामाटात साजरी होणार-नरेंद्र पाटील
 
अखंड भारताच्या कामगार चळवळीत सर्वात बलाढ्य समजल्या जाणा-या पहिल्या माथाडी कामगार संघटनेचे जन्मदाते. माथाडी कामगारच नव्हेतर त्यांच्या कुटुंबाचे आराध्यदैवत म्हणजे कै.आमदार अण्णासाहेब पाटील! पिळदार मिशा आणि बलदंड देहयष्टी लाभलेले हे माणूसरूपी परमेश्वर आज आपल्यात नसले तरी त्यांनी जन्माला घातलेला कामगार संघटनारुपी वटवृक्ष माथाडींना सदैव एकसंघ राहण्याच्या मुलमंत्राची सावली देत रहाणार आहे. त्या छात्रछायेत महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (रजि.) या संस्थेला,ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळीला, माथाडी कामगारांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी स्थापन केलेल्या अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी मर्यादीत आणि कष्टाची कामे करणा-या कामगारांसाठी महाराष्ट्र शासनाकडून स्थापन केलेल्या " महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम १९६९" या आशिया खंडातील एकमेव माथाडी कायद्याला ५० वर्षे पुर्ण झाली आहेत. स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी महान कष्ट व त्यागातून स्थापन केलेली ही संघटना व माथाडी कामगार चळवळ एकसंघपणे दाही दिशांना फोफावणार आहे. संपूर्ण आयुष्य व माथाडी कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी जगणारे कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांचे जीवनचरित्र म्हणजे माथाडींना सतत स्फुर्ती देणारा इतिहास म्हणावा लागेल.*
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खो-यात असलेल्या मंद्रुळकोळे या छोट्याशा खेड्यात कै.अण्णासाहेब पाटील यांचा कै.सखुबाई पाटील या भाग्यवान माऊलीच्या पोटी जन्म झाला. जन्मताच गरीबीत वाढत चाललेले अण्णासाहेब पाटील हे बालवयातच कष्टाबरोबर खेळू लागले. गावातल्याच शाळेत थोड्या फार इयत्ता शिक्षण घेऊन त्यांनी कुटुंबियाच्या उदरनिर्वाहाचे साधन शोधण्यासाठी मुंबई गाठली. सुरुवातीला ऊसाच्या चरख्यावर आपल्या कष्टकरी जीवनाला अण्णासाहेबांनी प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी दारुखाना परिसरात कष्टाची कामे केली. ही कामे करीत असताना मालकाकडून या कष्ट करणा-या कामगारांची चरख्यातील ऊसासारखी होणारी पिळवणूक पाहून अण्णासाहेबांचे मनही पिळवटून निघत होते. दिवसभर राबून रात्री झोपल्यावर कष्टकरी कामगारांवर होत असलेला अन्यायच अण्णासाहेबांच्या डोळ्यासमोर दिसायचा. त्यामुळे त्यांनी स्वतःच कामगार चळवळ उभारायला सुरुवात केली,हा-हा म्हणता कामगारांची ताकत मिळू लागली. त्यातूनच त्यांनी माथाडी कामगार संघटना स्थापन केली.स्व.यशवंतरावजी चव्हाण,स्व.वसंतदादा पाटील, स्व. वसंतराव नाई,लोकनेते बाळासाहेब देसाई,हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे,स्व.नरेंद्रजी तिडके,मा.शरदचंद्रजी पवार या नेत्यांकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्र शासनाकडून "माथाडी कायदा १९६९" हा माथाडी कायदा अंमलात आणला. विविध माथाडी मंडळांच्या योजना आणल्या. याच माथाडी कायदा,माथाडी मंडळांच्या योजनांवर आज लाखो माथाडी कामगार कष्टाचा योग्य मोबदला मिळवित सुखाने जीवन जगत आहेत.*
                *माथाडी कायदा,माथाडी मंडळे अंमलात आणल्यानंतर स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून लढा उभा केला. मराठा समाजाच्या मागणीसाठी विधानभवनावर दि. २२ मार्च, 1982 रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासमोर अण्णासाहेब पाटील यांनी भाषण करताना सांगितले की,"मराठा समाजाला न्याय दिला नाही तर उद्याचा सूर्य मी पहाणार नाही" अत्यंत करारी असलेल्या अण्णासाहेबांनी दि.२३ मार्च, १९८२ रोजी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. अण्णासाहेब नांवाच्या या माथाडींच्या देवताचा दुर्देवी अंत झाला. त्यामुळे तमाम माथाडी कामगार शोकसागरात बुडाला. तरीही एकसंघ राहून लढण्यास शिकलेल्या माथाडी कामगारांनी संघटनेची धुरा अण्णासाहेबांचे सुपुत्र शिवाजीराव पाटील यांचेवर सोपविली,त्यांनी पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून माथाडी कामगारांच्या हितासाठी अनेक सोयी-सुविधा शासनाकडे मागून पदरी पाडून घेतल्या. कोपरखेरणे येथिल माथाडी हॉस्पीटल,नवीमुंबईतील सिडकोची घरे,माथाडी भवन आदी प्रकल्प राबविण्यासाठी त्यांनी अक्षरशः रात्रं-दिवस कष्ट उपसले. पण म्हणतात ना "जो आवडे सर्वांना,तोची आवडे देवाला" या उक्तीप्रमाणे कै.शिवाजीराव पाटील हे माथाडींच्या कुटुंबातून देवाघरी निघून गेले,त्यांनी संघटनेला तुफानी नेतृत्व दिले,त्यानंतर संभाजीराव पाटील यांनी संघटनेचे नेतृत्व केले,त्यांचेही आकस्मित निधन झाले. त्यानंतरही माथाडींच्या आयुष्यात कोणतीही पोकळी जाणवू न देण्याचे काम कोण करीत असेल तर ते अण्णासाहेबांचे सुपुत्र मा.आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील तसेच त्यांना मोठ्या हिंमतीने आणि मनापासून साथ लाभली ती तरुण तडफदार पदाधिकारी गुलाबराव जगताप,आमदार शशिकांत शिंदे,एकनाथ जाधव इतर पदाधिका-यांची. या सर्वाच्या प्रामाणिक पुढाकारावर आणि युनियनचे कार्यकारी मंडळ व तमाम सभासदांच्या सहकार्याने आज ही माथाडींची बलाढ्य संघटना उभी राहिली आहे.*
*१. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत संघटनेची स्थापना.*
            *सन १९६२ साली आमदार अण्णासाहेब पाटील यांनी कष्टक-यांना संघटीत करुन त्यांची आशिया खंडातील एकमेव अशी अभेद्य संघटना स्थापन केली. माळेतील मोत्याप्रमाणे एक-एक कामगार कार्यकर्ता संघटीत करुन त्यांनी संघटनेची मुहर्तमेढ रोवली. सन १९६४ साली "महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन (रजि.)" या नांवाने संघटनेला रजिस्टार ऑफ ट्रेड युनियन कार्यालयाकडून नोंदणी मिळाली.*
*२. ऐतिहासिक माथाडी कायदा १९६९ ची व माथाडी मंडळांची स्थापना.* 
              *कामगार मालकांकडे रात्रं-दिवस कष्टाची कामे करीत होता. त्याला कामाचे योग्य दाम नाही, कामाची वेळ नाही, सुट्टी नाही अशा कठीण स्थितीत १२-१२ तास राबणा-या कष्टक-याला नोकरीविषयक संरक्षण मिळण्यासाठी आमदार अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र शासनाकडून "महाराष्ट्र माथाडी,हमाल व इतर श्रमजिवी कामगार (नोकरीचे नियमण व कल्याण) अधिनियम, १९६९" हा कायदा व त्यान्वये बृहन्मुंबई,ठाणे, रायगड,पालघर जिल्ह्याकरीता व्यवसायनिहाय माथाडी मंडळे व इतर जिल्ह्याकरीता जिल्हा माथाडी मंडळांच्या स्थापना केल्या. माथाडी कामगारांना माथाडी मंडळामार्फत कामाचे योग्य दाम व लेव्हीतून प्रा.फंड, ग्रच्युईटी,बोनस,भरपगारी रजा, अपघात नुकसान भरपाई, घरभाडे भत्ता आदी सुविधा मिळत आहेत.*
*३. कष्टकरी कामगारांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी माथाडी पतपेढीची स्थापना.*
              *माथाडी कामगारांना पठाणी व्याजाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी सन १९६९ मध्ये बृहन्मुंबई माथाडी कामगार सहकारी पतपेढीची स्थापना केली. या संस्थेतून कामगारांना लांब मुदतीचे कर्ज, तातडीचे कर्ज, घरकर्ज, सोनेतारण कर्ज मिळत आहे.*
*४. कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटीची स्थापना.*
          *कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचा स्वस्त दराने पुरवठा होण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर सन १९७६ मध्ये माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटीची स्थापना स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी केली.*
*५. आरोग्याच्या रक्षणासाठी माथाडी शुश्रूषा गृहाची स्थापना.*
            *माथाडी कामगार कष्टाची कामे करतात,त्यांच्या आरोग्याचे रक्षण होण्यासाठी स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी सन १९७३ मध्ये माथाडी शुश्रूषा गृहाची स्थापना केली, आज माथाडी हॉस्पीटल (ट्रस्ट) असे हॉस्पीटलचे नांव माथाडी असून,कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याचे रक्षण या हॉस्पीटलमार्फत केले जात आहे.*
*६. माथाडी कामगारांसाठी घरकुल.*
          *स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी सन १९८९ मध्ये तुर्भे,नवीमुंबई याठिकाणी कामगारांना सिडकोमार्फत घरे मिळवून दिली. त्यानंतर संघटनेने ऐरोली,घणसोली, कोपरखेरणे,नेरुळ याठिकाणी हजारो माथाडी कामगारांना सिडकोमार्फत घरे मिळवून दिली आहेत.*
*७. वयाच्या अवघ्या ४९ वर्षापर्यंत कष्टकरी माथाडी कामगारांसाठी वैभवशाली कार्य.*
                  *आमदार अण्णासाहेब पाटील यांनी कष्टाची कामे करणा-या माथाडी कामगारांची आशिया खंडातील अभेद्य अशी संघटना स्थापन केली,माथाडी कायदा, माथाडी मंडळांच्या योजना शासनाकडून आणल्या,माथाडी पतपेढी, ग्राहक सोसायटी, माथाडी हॉस्पीटल स्थापन केले. माथाडी कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनाला स्थैर्य प्राप्त करून देण्याचे वयाच्या अवघ्या ४९ वर्षांपर्यंत अभूतपूर्व असे कार्य केले.*
              *माथाडी कामगारांचे भाग्यविधाते/आराध्यदैवत स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी घालून दिलेली ध्येयधोरणे व त्यांच्या शिकवणुकीनुसार पदाधिका-यांनी काम करणे  आणि तमाम सभासद माथाडी कामगारांनी आपली एकसंघ ताकत व विराट शक्ती या संघटनेच्या पाठीशी कायम ठेवणे हीच अण्णासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.*
*देवतुल्य अण्णासाहेबांना जयंतीनिमित्त पुनश्चः भावपूर्ण आदरांजली.*