हळदीचे भाव तेजीतच कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?
एपीएमसी न्यूज डेस्क :आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या बाजारात मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरु आहे. त्यामुळे कापूस दरवाढीला पोषक वातावणर असूनही भावावर दबाव आहे. कापसाच्या वायद्यांमध्ये सातत्याने घट होत आहे. आज दुपारर्यंत ७८ सेंट प्रतिपाऊंडवर आले होते. देशातील बाजारातही चढ उतार सुरुच आहेत.
दुपारपर्यंत ५७ हजार ७७० रुपये प्रतिखंडीवर भाव होते. तर बाजार समित्यांमधील भावपातळी ७ हजार २०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान भाव होता. बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहून शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सोयाबीनच्या भावातही काही प्रमाणात चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आज दुपारपर्यंत ११.७८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड पुन्हा काहीसे कमी होऊन ३५३ डाॅलर प्रतिटनांवर आले होते.
देशातील बाजारातही सोयाबीनमध्ये नरमाई आली आहे. सोयाबीनचा भाव ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. सोयाबीनच्या भावातही आणखी काही दिवस दबाव राहील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
हळदीच्या भावातील तेजी कायम आहे. सध्या लग्नसराईमुळे हळदीला चांगला भाव मिळत आहे. तर दुसरीकडे बाजारातील हळदीची आवक कमीच आहे. देशातील उत्पादन यंदा घटल्याने आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ऐन आवकेच्या हंगामातही भाव चांगले होते. सध्या हळदीला सरासरी १४ हजार ते १८ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
यापुढेही हळदीला चांगली मागणी राहील. पण लागवडीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर दरात काहीसे करेक्शन येऊ शकते. त्यानंतर सणांची मागणी वाढल्यानंतर दराला पुन्हा आधार मिळू शकतो, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
आल्याचे भाव देशातील बाजारात टिकून आहेत. मागील हंगामापासून देशातील आल्याचे उत्पादन कमी झाले आहे. पण दुसरीकडे मागणी चांगली आहे. बाजारातील आवकच कमी असल्याने दराला चांगला आधार मिळाला.
सध्या आल्याचे भाव सरासरी भावपातळी सध्या ७ हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येत आहे. आल्याची ही भावपातळी आणखी काही दिवस टिकून राहू शकते. तर पुढील काळात बाजारातील आवक कमी झाल्यानंतर दाराला काहीसा आधार मिळेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
देशातील बाजारात सध्या तुरीचे भाव टिकून आहेत. तुरीला सध्या सरासरी १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. दुसरीकडे बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे.
महत्वाच्या तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील बाजारांमध्ये तूर आवक नगण्य होत आहे. तर दालमिल्स गरजेप्रमाणे तूर खरेदी करत आहेत. सध्या तूर बाजारातील स्थिती पाहता पुढील काळात तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहू शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.