हमीभाव म्हणजे काय? कसा ठरवला जातो?
 
हमीभाव म्हणजे काय? कसा ठरवला जातो?
राज्यात पावसाच्या कमतरतेमुळे यंदा उत्पादनात घट झाली.त्यातच निर्यातबंदी, मागणी पुरवठ्याच्या गणितांमुळे शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याचे दिसत आहे. पण हा   हमीभाव म्हणजे काय? कसा ठरवला जातो? कोण ठरवते? आता कोणत्या पिकाला काय हमीभाव आहे? जाणून घेऊया...
हमीभाव म्हणजे काय?
किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price) म्हणजे हमीभाव. हा भाव म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या शेतमालावर ठराविक किंमत मिळणारच याची हमी असते. सध्या केंद्र सरकार देशाभरातील २३ शेतमालांची हमीभावाने खरेदी करते. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे.
हमीभाव कोण ठरवते?
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय हमीभाव ठरवते. कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट ॲंड प्रायझेस च्या आकडेवारीवरून हा भाव ठरवला जातो. हा दर सगळ्या राज्यांमध्ये समान असतो.   म्हणजे यंदा गव्हाचा हमीभाव २२७५ रुपये प्रतिक्विंटल असेल तर सर्व देशात याच हमीभावाने गव्हाची खरेदी केली जाईल.
कसा ठरवला जातो हमीभाव?
उत्पादन खर्च अधिक त्या खर्चाच्या ५० टक्के नफा, एवढा हमीभाव देण्याची घोषणा २०१८च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली होती. उत्पादन खर्च ठरवण्याचे सरकारचे वेगवेगळे निकष आहेत. त्यानुसार उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकारही निश्चित करण्यात आले आहेत. हा उत्पादनखर्च ठरवण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने ३ सूत्रं निश्चित केली आहेत. त्यानुसार हमीभाव ठरवला जातो.
उत्पादन खर्च ठरवण्याचे पहिले सूत्र
अ-२ हे उत्पादन खर्च ठरवण्याचे पहिले सूत्र आहे. यामध्ये बियाणे, खते रसायनिक औषधे, मजूर, सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च उत्पदन खर्च गृहीत धरला जातो.
दुसरे सूत्र
या सूत्रानुसार शेतकरी आणि त्याच्या घरातील व्यक्तींच्या श्रमाचे मूल्यही मोजले जाते. म्हणजे घरातील व्यक्ती शेतात काम करत असतील तर त्यांचा श्रमाचाही खर्च ठरवताना विचार केला जातो. केंद्र सरकार हमीभाव या सूत्रानुसार ठरवते.
हमीभावापेक्षाही कमी दराने व्यापारी खरेदी करताहेत शेतकऱ्यांकडून कापूस
तिसरे सूत्र
या सूत्रानुसार बियाणे, खते, रासायनिक औषधं, मजूर, सिंचन, इंधन, कुटुंबाचे श्रम याबरोबर श्रम यासोबतच गुंतवणुकीवरील व्याज आणि शेत जमिनीचं भाडं निश्चित करून त्याद्वारे उत्पादन खर्च ठरवला जातो. या सूत्राचा आधार घेऊन हमीभाव ठरवल्याने कृषी उत्पादनाला अधिक भाव मिळाल्याचे सांगण्यात येते.
तूर आणि उडीद डाळींच्या आयातीसंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, बाजारभावावर काय होणार परिणाम?