Apmc News : बाजारातील शेतमालाच्या महत्वाचे TOP 5 बातम्या -13 एप्रिल 2023
१) सोयाबीन बाजार स्थिर (Soybean Rate)
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात (Soyameal Rate) आज सुधारणा पाहायला मिळाली. सोयाबीनचे वायदे दुपारपर्यंत १५.१३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड वायद्यांनी ४६४ डाॅलरचा टप्पा गाठला. देशातील बाजारात सोयाबीनचे दर आज स्थिर होते.सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातून होणारी सोयापेंड निर्यात पाहता सोयाबीन दरात सुधारणा अपेक्षित असल्याचं जाणकारांनी सांगितलं.
२) कापूस दरात चढ- उतार (Cotton Rate)
देशातील बाजारात काहीसे चढ उतार सुरु आहेत. मागील दोन दिवसांमध्ये कापूस दर क्विंटलमागे १०० रुपयांनी नरमले. कापसाला सध्या ७ हजार ९०० ते ८ हजार ४०० रुपये दर मिळते आहे. तर आंतराराष्ट्रीय बाजारात कापूस दर स्थिर आहेत.कापसाचे वायदे ८२.८३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. पुढील काळात देशातील बाजारात कापसाची आवक मर्यादीत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं कापूस दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
३) कांदा बाजारभाव टिकून (Onion Bajarbahv)
बाजारातील कांदा आवक मागील काही दिवसांपासून स्थिर दिसते. त्यामुळं दरही स्थिर दिसतात. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार रुपये भाव मिळतोय.सध्या रब्बी हंगामातील कांदा काढणी सुरु आहे. त्यामुळं कांदा आवकेचा दबाव कायम राहू शकतो. या काळात दरही स्थिर दिसतील, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
४) गवारचे दर तेजीतच
राज्यातील बाजारात गवारचे दर सध्या तेजीत आहेत. बाजारातील आवक कमी असल्याने गवार चांगला भाव खात आहे. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर आणि कल्हापूर बाजारातील आवक १०० क्विंटलपेक्षा कमीच दिसते.
त्यामुळे गवारला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ते ६ हजार रुपये मिळतोय. गवारची आवक पुढील काही दिवस कमीच राहू शकते. त्यामुळे गवारचे दरही तेजीतच दिसतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
५) सध्या मक्याचे दर काय आहेत? (Maize Rate)
देशातील बाजारात रब्बी हंगामातील मका दाखल होतोय. बिहार आणि मध्य प्रदेशात मक्याची आवक वाढत आहे. पावसाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांना मका वाळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळं काही शेतकरी मका काढणीनंतर लगेच विक्री करत आहेत.
परिणामी मक्यातील ओलावा अधिक दिसतो. सध्या बिहार राज्यातील बाजारांमध्ये आवक जास्त आहे. यंदा मक्याचे पीक चांगले आहे. गेल्या हंगामात रब्बीत १०१ लाख टन मका उत्पादन झाले होते. ते यंदा १०७ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज आहे.
यंदा बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात मका पिकाची स्थिती चांगली आहे. उत्पादन चांगलं येण्याच्या शक्यतेने बाजारात दरही काही प्रमाणात कमी झाले. मागील काही आठवड्यांमध्ये मका दरात १५ टक्क्यांची नरमाई आली.
मक्याचे दर बिहार, महाराष्ट्र, मध्य प्रदेशात सरासरी २ हजार ते २ हजार १०० रुपयांच्या दरम्यान आहेत. खरिपातील मक्याला यंदा चांगला भाव मिळाला. त्यामुळं शेतकरी कमी भावात लगेच मका विकण्याची शक्यता कमी आहे.
चांगल्या भावाच्या अपेक्षेने शेतकरी मका मागं ठेवतील, असा अंदाज आहे. त्यामुळं मक्याचे दर हमीभावाच्या दरम्यान राहू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.