साखरेच्या जागतिक बाजारात तेजीचा माहोल
साखरेच्या जागतिक बाजारात तेजीचा माहोल
जागतिक बाजारात साखरेचे दर चढेच राहण्याची शक्यता
यंदा केंद्र सरकार आणखी साखर निर्यातीला किती परवानगी देईल ?
यंदा जागतिक बाजारात साखरेचे दर चढेच राहतील, अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. सध्या तरी जागतिक बाजारात अपेक्षेपेक्षा साखरेचा साठा कमी आहे. भारत सरकारने निर्यातीवर निर्बंध घातल्याने जागतिक बाजारात तातडीने साखर येईल, अशी अपेक्षा नसल्याचे जागतिक बाजारपेठेतील व्यापारी सूत्रांनी सांगितले आहे . भारतातून गेल्यावर्षी शंभर लाख टनांहून अधिक साखरनिर्यात झाली होती. यंदा भारतातून घटलेल्या साखरेची जागा ब्राझील व थायलंडमधील कारखानदार घेण्याची शक्यता आहे. भारतात घटत्या साखर उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार यंदा आणखी निर्यातीला किती परवानगी देईल, याबाबत साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी जितका दबदबा भारतीय साखरेचा आंतरराष्ट्रीय बाजारात होता तितका दबदबा यंदा राहणार नाही, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
सध्या तरी जागतिक बाजारात अपेक्षेपेक्षा साखरेचा साठा कमी आहे. ब्राझील व थायलंड वगळता अन्य प्रमुख देशांमध्ये साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. ब्राझील व थायलंडमध्ये साखरेचे उत्पादन वाढणार असले तरी ते वाढीचे प्रमाण अत्यल्प असेल, असे साखर उद्योगातील जाणकार सांगतात. ब्राझीलमध्ये सात ते आठ टक्के साखरेचे उत्पादन वाढणार असले तरी भारतासारख्या गेल्यावर्षी अव्वल नंबर ठरलेल्या देशामध्ये निर्यातीवर निर्बंध आणण्यात आले.त्यामुळे भारतातून जागतिक बाजारपेठेत अत्यंत कमी प्रमाणात साखर येत्या काही महिन्यात जाईल, अशी शक्यता आहे.
जरी ब्राझीलचे साखर उत्पादन वाढले तरीही भारतामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेची चणचणच राहील, असा अंदाज आहे.