बाजारसमिती निवडणुकीत महाविकास आघाडी फुटली - काँग्रेसचा हात शिवसेनेची भाजपाला साथ ?
नवी मुंबई: राजकारण म्हंटल कि वेगवेगळी वळण हि येतातच सध्या बाजारसमिती मधील राजकरणात कोणत्या घडामोडी चालू आहेत जाणून घेऊयात.
राजकारणात पुन्हा नवीन ट्विस्ट , सत्तेसाठी नेते मंडळींची पक्षातून पळापळ 
पुण्यात महाविकासआघाडीत बिघाडी, काँग्रेससह चक्क ठाकरे गटही भाजपसोबत
पुणे :- जिल्ह्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र आहे. खेड बाजार समितीवर राष्ट्रवादी काँगेसचे आमदार मोहिते पाटील यांच्या विरुद्ध काँग्रेस आणि दोन्ही शिवसेनेसह भाजपची आगळी युती पहायला मिळत आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर NCPचे आमदार   दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांचा ताबा आहे. या निवडणुकीत आमदार मोहित यांच्या ताब्यातील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर कब्जा करण्यासाठी विरोधकांनी आगळा-वेगळा प्रयोग केला आहे. या निवडणुकीसाठी चक्क भाजप आणि ठाकरे गट हे हाडवैरी एकत्र आले आहेत. त्यांना काँग्रेस आणि शिंदेच्या शिवसेनेचीही साथ मिळाली आहे. येत्या 28 तारखेला मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी अवघे काही दिवसच मिळणार असल्याने दोन्ही पॅनलकडून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे. बाजार समितीत झालेल्या कारभार उघड करण्यासाठी आणि बाजार समिती वाचविण्याची आम्ही सर्व पक्ष एकत्र आलो असल्याचे ठाकरे गटाकडून बोलले जात आहे.
अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. 18 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. दरम्यान, खेड तालुक्यावर आमदार मोहिते यांचे 2004 पासून कायम वर्चस्व राहिले आहे. मोहितेंविरुद्ध त्यांचे सगळे विरोधक एकत्र येऊनही ते विधानसभेसह जिल्हा परिषद, तालुका पंचायत आणि जिल्हा बँकेची निवडणूक लढवित आहेत.
बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी फुटली काँग्रेसचा हात शिवसेना भाजपला साथ.?
राज्यात कृषी उत्पन्न बाजार समिती   निवडणुकाची (APMC Election)   पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सर्वात मोठी समजली जाते. या निवडणुकीत दोन माजी मंत्र्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जवळा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत 18 संचालक पदासाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत.
काँग्रेसचा हात शिवसेना भाजपला साथ.?
आता जवळा बाजार मार्केट कमिटीच्या निवडणूकीत काँग्रेसचा एकही पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी सोबत नाही. काही महिन्यांपूर्वी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे औंढा तालुका अध्यक्ष अंकुश आहेर यांनी माजी मंत्री डॉ जय प्रकाश मुंदडा यांच्या अडमुठ्या धोरणाला कंटाळून (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकून भाजपा नेते बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
वसमतमध्ये काय घडलं?
काही महिन्यांपूर्वीच वसमत येथील मार्केट कमिटीची निवडणूक विधानसभेच्या निवडणूकीपेक्षाही रंगतदार झाली होती. त्या वेळी राष्ट्रवादीने काँग्रेससह महाविकास आघाडीतील काही नेत्यांना विश्वासात घेतले नव्हते. त्याचा राग मनात धरुन ह्या निवडणूकीत महाविकास आघाडीत अनेक ठिकाणी फूट पडल्याचं बघायला मिळत आहे. त्यावेळीसुद्धा काँग्रेसला विश्वासात घेतले नसल्याने महाविकास आघाडीत फूट पडली होती. तशीच फूट आता जवळा बाजार सह इतर ठिकाणी मार्केट कमिटीच्या निवडणूकीत पडलेली दिसत आहे. ह्या ठिकाणीसुद्धा काँग्रेसला विश्वासात घेतले नसल्याचं बोलल जात आहे..
हिंगोली बाजारसमितीत काय चित्र?
हिंगोली बाजार समितीत बिनविरोधचा डाव फसला. महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीला बाहेर फेकल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ह्या ठिकाणी आघाडीत बिघाडी झाल्याने युती फायद्यात राहणार आहे. त्यातही युतीचा एक उमेदवार बिनविरोध झाला आहे.
हिंगोली बाजार समितीसाठी 47 उमेदवार रिंगणात आहेत . भाजप शिवसेनेचे दोन्ही गट, काँग्रेस यांचा एक पॅनल.तर राष्ट्रवादीने त्यातील एकदोन नाराज असणाऱ्यांना सोबत घेऊन वेगळा पॅनल केला आहे.तर काहींनी अपक्षचा झेंडा हाती घेतला असल्याने ह्या ठिकाणी चुरस वाढणार आहे..
सेनगावमध्येही आघाडीत बिघाडी
सेनगाव येथेही राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर दिसतोय. भाजप ,काँग्रेस व शिवसेना विरुद्ध सरपंच युनियन व शेतकरी संघटना असा सामना रंगणार आहे.
कळमनुरीत 17 जागांसाठी 34 उमेदवार
कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे सेना व भाजप युती अशी सरळ लढत आहे. आमदार संतोष बांगर यांचे होम ग्राउंड असल्याने या मार्केट कमिटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीला धक्का! देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक बिनविरोध झाल्याने व भाजपच्या हातात एक हाती सत्ता
मागील सात वर्षापासून राष्ट्रवादीकडे असणारी देवरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर नामनिर्देशन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध झाली असून, भाजपचे 18 संचालक निवडून आल्याने   कृषी उत्पन्न बाजार समिती मधून NCP चा संपूर्ण सफाया झाला. भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 संचालकासाठी निवडणूक होणार होती. याकरिता भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने कंबर कसली होती. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त संचालक निवडून यावे याकरिता सर्वांनी रणनीती आखली होती. बाजार समितीया निवडणुकीकरिता विविध गटातून एकूण 59 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. यात छाननी मध्ये २ व अपील मध्ये २ असे एकूण चार उमेदवारांचे नामांकन बाद झाले होते. एकूण 55 नामांकन वैद्य ठरले होते. यापैकी 37 उमेदवारांनी काल आपले नामांकन परत घेतले. व अठरा भाजपच्या उमेदवारांचे नामांकन वैध ठरले व यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध झाली. यामध्ये भाजपचे निवडून आलेले सेवा सहकारी संस्था गटाचे सुखचंद राऊत, प्रमोद संगिडवार, यादवराव पंचमवार, श्रीकृष्ण हूकरे, कमल येरणे, बबलू डोये, आसाराम पालीवाल, महिला राखीव गटातून गोमती तितराम, देवकी मरई इतर मागासवर्ग प्रवर्गातून गणेश भेलावे, भटक्या विमुक्त जमाती मधून द्वारका धर्मगुडे ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून अनिल बिसेन, शिवदर्शन भेंडारकर अनुसूचित जाती जमाती गटातून धनराज कोरोंडे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक गटातून विजय कश्यप व्यापारी व अडत्या गटातून दीपक अग्रवाल व अंशुल अग्रवाल, हमाल व तोलारी गटातून मारुती खंडारे हे बिनविरोध निवडून आले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्याकरिता भाजपने विशेष रणनीती आखली होती.काँग्रेसच्या संचालकाचा भाजपमध्ये प्रवेश कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीच्या निवडणुकीमध्ये नामांकन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी इतर मागासवर्ग प्रवर्ग गटातून निवडून आलेले काँग्रेसचे गणेश भिलावे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर, भटक्या विमुक्त जमाती मधून निवडून आलेले चिचगड चे काँग्रेसचे कार्यकर्ते द्वारका धरमगुडे व हमाल तोलारी गटातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मारुती खंडारे यांनी भाजपला पाठिंबा दर्शविला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक बिनविरोध झाल्याने व भाजपच्या हातात एक हाती सत्ता आल्याने भाजपने फटाके फोडून व मिठाईवाटून आज जल्लोष साजरा केला.
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची एक हाती सत्ता - १८ पैकी १७ जागा बिनविरोध
पनवेल - पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १७ जागा बिनविरोध आल्याने पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची एक हाती सत्ता आली आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या   ७ जागा बिनविरोध झाल्या होत्या आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या १० जागा बिनविरोध झाल्या. एका रिक्त जागेसाठी पुन्हा निवडणूक होणार आहे. बिनविरोध निवडून आलेल्यामध्ये देवेंद्र मढवी, बाळकृष्ण पाटील,अशोक गायकर,मच्छिंद्रनाथ पाटील, नारायण घरत,अर्जुन गायकर, महादू पाटील ,सुभाष पाटील, सखाराम पाटील ,ललिता फडके, प्रताप हातमोडे ,रामचंद्र पाटील, देवेंद्र पाटील ,सुनील सोनावळे, सोमनाथ म्हात्रे ,दिनेश महाडिक, आतिश पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे ,त्यामुळे महाविकास आघाडीची पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता आली आहे.
मनमाड बाजार समितीच्या निवडणुकीला गालबोट
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक अर्ज माघारीच्या दिवशी बाजार समितीच्या हॉलमध्ये शिंदे गट व महाविकास आघाडी मधे   फ्री स्टाईल हाणामारी
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिंदे गट व महाविकास आघाडी मधे हाणामारी
मनमाड :- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या माघारीच्या शेवटच्या दिवशी माघारी दरम्यान निवडणूक कार्यालयात उमेदवाराच्या माघारीवरून आक्षेप घेतल्याने शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्ये शाब्दीक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने एकच गदारोळ झाला.या घटनेत महाविकास आघाडीला मदत करण्याच्या एक तरुण जखमी झाल्याचे समजते
नाशिक बाजार समिती निवडणूक रणधुमाळीत पिंगळे गटास धक्का!
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राजकीय डावपेचांमुळे रंगतदार अवस्थेत येऊ लागली आहे. पिंगळे गटाकडून विरोधकांवर राजकीय शरसंधान केले जात आहे. पिंगळे यांनी चुकीच्या पद्धतीने व राजकीय संबंधांचा वापर करून केलेल्या सात सोसायट्या उच्च न्यायालयाने मतदानासाठी रद्द केल्याचा निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे पिंगळे यांना मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.
माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी बाजार समितीबरोबरच जिल्हा बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हक्काच्या मतदानासाठी या सात सोसायट्यांची निर्मिती केली होती. यामध्ये ९० टक्के संचालक हे पिंगळे यांच्या कुटुंबातील व एकाच घरातील चार ते पाच सदस्य या संस्थेत आहेत. सदर संस्थांमध्ये एकूण ९१ संचालक असून, त्याचा थेट फायदा नाशिक बाजार समिती व जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घेता येणार होता. सदरील सात सोसायट्या या कर्ज वाटप सोसायट्या नसून त्या सेवा देणाऱ्या संस्था होत्या. मात्र, निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे फक्त कर्ज वाटप करणाऱ्या संस्थांना मतदानाचा अधिकार असतो व त्यामुळे सदर संस्थेच्या संचालकांना मतदान करण्याचा अधिकार उरलेला नव्हता. यामुळे सदरील सर्व सात संस्थांनी तालुका उपनिबंधक यांच्याकडे सदर संस्थांचे वर्गीकरण कर्ज वाटप संस्थामध्ये करण्याबाबत अर्ज केला. कायदे व नियमांप्रमाणे मूळ उपविधीमध्ये बदल करता येत नसल्याने तालुका उपनिबंधक यांनी सदर अर्ज नाकारला. याबाबत सदर संस्थांनी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे अपील दाखल केले. विभागीय सहनिबंधक यांनी देखील सात सोसायट्यांचा अर्ज नाकारला.
सदर आदेशाविरूरुद्ध या सात सोसायट्यांनी पणनमंत्री यांच्याकडे धाव घेत अपील दाखल केले. राज्य सरकार अल्प मतात आल्यानंतर घाईघाईने घेण्यात आलेल्या सुनावण्यांमध्ये पिंगळे यांनी राजकीय संबंधांचा वापर करून सदर सात सोसायट्यांबाबत विभागीय सहनिबंधक व तालुका निबंधक यांनी केलेले आदेश रद्द करून घेतले.यामुळे सदर संस्थांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. याबाबत गावातील इतर सहकारी संस्थांनी याविरुद्ध उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर अपिलावर वेळोवेळी सुनावणी होऊन सोमवारी (ता. १७) उच्च न्यायालय मुंबई यांनी सात संस्थेंबाबत पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आदेश रद्द केलेले आहे.त्यामुळे या सातही सोसायट्यांच्या संचालकांना मतदानाचा अधिकार राहिलेला नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अशा प्रकारे बोगस सोसायटी स्थापन करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.अशा प्रकारे बाजार समितीची निवडणूक चांगलीच रंगलेली असून, मतदान बाद झाल्यामुळे सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये काय निकाल येईल, याकडे जिल्ह्यातील सर्व शेतकरी व सहकार विभागाचे लक्ष लागले आहे.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाड शिवसेना ठाकरे गटाचा डावलल्याचा आरोप
राज्यामध्ये भाजपविरोधात वज्रमुठ बांधणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये सांगलीत मात्र बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने   बिघाड झाला आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये   भाजप विरोधात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आली आहे. भाजप विरोधात महाविकास आघाडी निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, शिवसेना उध्दव ठाकरे गटाला डावलण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीवर सडकून टीका देखील करण्यात आली आहे. 
18 अर्ज माघार घेतले
महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला कोणतेही स्थान बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये देण्यात आले नाही, त्यामुळे बाजार समितीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेले 18 अर्ज माघार घेऊन महाविकास आघाडीच्या कारभाराचा आम्ही निषेध नोंदवल्याचं संजय विभूते यांनी जाहीर केले आहे. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आपली आघाडी नसल्याचं संजय विभूते यांनी स्पष्ट केले आहे.
अजितराव घोरपडे म्हणजे शिवसेना नाही
दरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढणार असल्याचे घोषित केले होते. काँग्रेस आमदार विक्रमसिंह सावंत, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे अविनाश पाटील, मनोजबाबा शिंदे यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. मात्र, ज्या ठाकरे गट म्हणून कवठेमहांकाळमधील ज्या घोरपडे गटाला दोन जागा देण्यात आलेत ते अजितराव घोरपडे म्हणजे शिवसेना नाही. घोरपडे यांनी जाहीररित्या आपण उद्धव ठाकरे गटात असल्याचे जाहीर करावं, असे आव्हान देत अजितराव घोरपडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव देत असल्याचे शिवसेना ठाकरे गटचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी माहिती दिली.
बाजार समितीच्या निवडणुकीत ९ माजी संचालकांचे अर्ज अवैध
दरम्यान, निवडणुकीत मागील संचालक मंडळातील 9 माजी संचालकांचे अर्ज अवैध ठरले आहेत. समितीच्या कामातील अनियमितता, अपहाराचा ठपका ठेवल्याने त्यांना अपात्रतेचा दणका बसला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी हा निर्णय दिला आहे. दोन्ही गटांकडून घेण्यात आलेल्या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. दोन्हीकडील बाजू जाणून घेतल्यानंतर बाजार समितीतील संचालकांच्या कारभारावर चौकशी अहवालातील आक्षेपामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे निर्णय यांनी नऊ माजी संचालकाचे अर्ज अवैध ठरवले.
सांगोल्यातील   नेत्यांची एकी तर कार्यकर्त्यांमध्ये बेकी सांगोल्यात दोन जागा बिनविरोध, 16 जागांसाठी 44 अर्ज
सांगोला : सांगोला तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये 'नेत्यांमध्ये एकी झाली परंतु कार्यकर्त्यांमध्ये बेकी' निर्माण झाल्याचे चित्र दिसून आली. सत्ताधारी शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आदी पक्षांच्या नेत्यांची युती झाली असली तरी याच पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी मात्र आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले नाही. या निवडणुकीत एकूण 18 जागा जागांपैकी दोन जागा बिनविरोध झाल्याने 16 जागांसाठी आता 44 जणांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लक्ष लागून राहिलेल्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडीचे परंपरा खंडित झाली आहे. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. सत्ताधारी शेकाप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळाचे शेवटपर्यंत बिनविरोधसाठी प्रयत्न केले. डॉक्टर बाबासाहेब देशमुख, चंद्रकांत देशमुख, शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे दीपक साळुंखे पाटील, भाजपचे निवडणुकीसाठी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. या पक्षांमध्ये जागा वाटपाचा तिढा जरी सुटला असला तरी या पक्षातील उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले नाहीत.जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख यांचेही पॅनल या निवडणुकीत तसेच ठेवले आहे. त्यांच्याबरोबरच राष्ट्रवादीचे बाबुराव गायकवाड, आरपीआयचे खंडू सातपुते, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेतेमंडळी एकत्रीत येऊन पॅनल तयार करण्याची शक्यता आहे.सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत 18 संचालकाची निवड 2 हजार 183 मतदार करणार आहेत. सहकारी संस्था मतदारसंघात 11 जागा असून सर्वसाधारण गटातून 7 जागेसाठी 20 अर्ज, महिला गटातून 2 जागेसाठी 3 अर्ज, इतर मागासवर्गीय गटातून एका जागेसाठी 2 अर्ज,
इतर विमुक्त जाती भटक्या जमाती गटातून एका जागेसाठी 4 अर्ज, ग्रामपंचायत मतदारसंघात 4 जागा असून सर्वसाधारण गटातून 2 जागेसाठी 9 अर्ज, अनुसूचित जाती जमाती गटातून एका जागेसाठी 2 अर्ज, व्यापारी मतदारसंघात दोन जागेसाठी 4 अर्ज असे 16 जागेसाठी 44 उमेदवारी निवडणुक लढवत आहेत. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून एका जागेसाठी 1 अर्ज आणि हमाल व तोलार मतदारसंघात एका जागेसाठी 1 अर्ज राहिल्याने दोन जागा बिनविरोध झाल्या असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी प्रमोद दुरगुडे यांनी दिली.अर्ज माघारी घेण्यासाठी गोंधळ अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटच्या दिवशी तीन वाजल्यानंतर अनेक उमेदवारांनी नामनिर्देश अर्ज माघार घेण्यासाठी कार्यालयात आले होते. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मुदत, वेळ संपल्याने अनेक उमेदवारांना अर्ज माघारी घेता आले नाहीत. यावेळी कार्यालयात मोठा गोंधळही निर्माण झाला होता. अनेकांना आता नको असतानाही लढावे लागणार आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्व. भाई माजी गणपतराव देशमुख परिवर्तन महाविकास आघाडी स्थापन करून विचारांची लढाई लढणार आहे. या आघाडीत सर्व पक्षातील उमेदवारांना सामावून घेतले जाणार आहे. प्रचारात शेकापचा झेंडा घेवून आबासाहेबांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - सचिन देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य.
पुण्यात ५७ उमेदवार रिंगणात तर १३८ जणांची माघार
कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणूकीत १८ जागांसाठी निवडणूकीत एकूण १९५ अर्ज वैध ठरले होते. त्यामध्ये गुरूवारपर्यंत   १३८ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत.
पुणे - कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या निवडणूकीत १८ जागांसाठी निवडणूकीत एकूण १९५ अर्ज वैध ठरले होते. त्यामध्ये गुरूवारपर्यंत (ता.२०) १३८ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे समितीच्या निवडणुकीत ५७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. बाजार समितीची निवडणूक तब्बल २० वर्षांनंतर होत असल्याने यामध्ये रंगत आली आहे.
सेवा सहकारी संस्था मतदार संघातून ११ जागांसाठी २९ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामध्ये सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून ७ जागांसाठी २१ उमेदवार, सेवा सहकारी संस्था महिला राखीव गटातून २ जागांसाठी ४ उमेदवार, सेवा सहकारी संस्था इतर मागासवर्गातून १ जागेसाठी २ उमेदवार, सेवा सहकारी संस्था विमुक्त/ भटक्या जातीमधून १ जागेसाठी २ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून ४ जागांसाठी ११ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून २ जागांसाठी ६ उमेदवार, ग्रामपंचायत अनु. जाती जमाती गटातून १ जागेसाठी ३ उमेदवार, ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गटातून १ जागेसाठी २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
व्यापारी-अडते मतदार गटातून २ जागांसाठी १२ उमेदवार, हमाल- तोलणार गटातून १ जागेसाठी ५ उमेदवार निवडणूक लढवीत असून बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी तब्बल ५७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निवडणूकीत उमेदवारांनी प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात केली असून मतदारांच्या गाठी भेटू सुरू केल्या आहेत. चिन्ह वाटप केल्यानंतर प्रचाराचा आणखी जोर वाढणार आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनेलसाठी ३ अर्ज प्राप्त झाले आहेत. उद्या (ता.२१) सकाळी ११ वाजेपर्यंत पॅनेलसाठी अर्ज करण्यास मुदत आहे. त्यांनतर ज्यांनी पहिल्यांदा अर्ज केला आहे त्यानुसार चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.
- प्रकाश जगताप, निवडणुक निर्णय अधिकारी
सातारा : सातारा बाजार समिती निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून दुरंगी लढत होत आहे. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला साथ देत एकप्रकारे सत्ताधारी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना शह दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची होणार आहे.
सातारा बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक होत आहे.एकूण १८ जागा आहेत. या संस्थेवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाची ३० वर्षांपासून सत्ता आहे. या सत्तेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आव्हान देण्याचा प्रयत्न केला असून सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या या लढ्याला व पॅनेलला खासदार उदयनराजे भोसले साथ, पाठिंबा द्यावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोसले, अर्जून साळुंखे यांच्यासह शिष्टमंडळ गेले होते. त्यावेळी उदयनराजेंबरोबर सविस्तर चर्चा झाली.
जगाचा पोशिंदा भरडला जातोय. त्यांच्या हक्कांना डावललं जातंय, शेतकरी संघटना या राजवटीच्याविरोधात लढत असून फक्त लढ म्हणा... अशी भावनिक साद स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी उदयनराजेंना घातली. त्यानंतर उदयनराजेंनीही ताकदीने पॅनल उभे करा. हम करेसो कायदा म्हणणाऱ्यांना जागा दाखवा, असे स्पष्ट केले. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच बळीराजाचे बळ आणखी वाढले आहे. तर खासदार उदयनराजेंच्या या भूमिकेमुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यापुढे आव्हान उभे राहणार आहे. उदयनराजेंची ताकद बळीराजाला मिळणार असल्याने निवडणूकही रंगतदार होणार आहे.
सातारा या राजधानीत खऱ्याअर्थाने बळीराजाचं राज्य येण्यासाठी खासदार उदयनराजेंचा आशीर्वाद मिळाला आहे. यामुळे सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांत चैतन्य निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणजे कधी उसाच्या तर कधी टक्केवारीच्या विळख्यात अडकलेला शेतकरी खऱ्याअर्थाने बाजार समितीवर मालक म्हणून बसलेला दिसेल.- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना
 
मंगळवेढा   बाजार समितीत बबनराव अवताडे ठरणार किंगमेकर
मंगळवेढा - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत तालुक्यातील सहकारातील ज्येष्ठ नेते बबनराव अवताडे हेच या निवडणुकीत किंगमेकर ठरणार आहेत. या निवडणुकीत आ. समाधान आवताडे व समविचारी गटाची भूमिका महत्त्वाची ठरणारी असली तरी तिचे पडसाद आगामी निवडणुकीवर दिसून येणार आहेत.